‘सामाईक प्रवेश परीक्षे’च्या (जेईई) मुख्य (मेन्स) परीक्षेत आपण गृहीत धरलेल्या गुणांपेक्षा कितीतरी कमी गुण मिळाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केल्याने ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेतील प्रवेशांसाठी पहिल्यांदाच झालेली ही प्रवेश परीक्षा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
जेईई-मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशभरातून १२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पण, निकाल हातात पडताच अनेक विद्यार्थ्यांची निराशा झाली. आपण गृहित धरलेले गुण आणि प्रत्यक्षात मिळालेले गुण यातला फरक फार मोठा आहे, असे अनेकांनी सांगितले. उदाहरणार्थ लेखा वारके या विद्यार्थिनीने १५६ गुण अपेक्षिले होते पण, तिला प्रत्यक्षात ३७ गुणच मिळाले आहेत. एखाददुसऱ्या गुणाचा फरक समजू शकतो. पण, एवढा फरक कसा असू शकतो, अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली. ही परीक्षा ऑनलाइन देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणात अशा तफावतीचे प्रमाण खूप जास्त आहे, असे राव आयआयटी अकॅडमीचे रसायनशास्त्राचे शिक्षक प्रशांत पांडे म्हणाले. काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचेही होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयआयटी-पेसच्या रुचित बिर्ला यालाही २५० गुणांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ९५ गुणच मिळाले.
आयआयटीच्या एका प्राध्यापकाच्या मुलीने १२९ गुण गृहीत धरले होते पण तिला अवघे ३६ गुण मिळाले. आता तर सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या गुणांच्या ओएमआर तालिकाही संकेतस्थळावरून काढून टाकल्या आहेत. त्यामुळे, या गुणदानाला आव्हान देणेही शक्य नाही, असे या प्राध्यापकांनी सांगितले.
दरम्यान मुख्य परीक्षेत यशस्वी ठरलेल्या दीड लाख विद्यार्थ्यांची निवड २ जूनला होणाऱ्या‘अॅडव्हान्स’ परीक्षेच्या टप्प्याकरिता होत आहे. आयआयटीतील तब्बल १० हजार जागांचे प्रवेश विद्यार्थ्यांच्या या परीक्षेतील यशावर अवलंबून आहेत. अर्थात हे विद्यार्थी त्या त्या शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत पहिल्या २० पर्सेटाईलमध्ये असणे आवश्यक आहेत.
एनआयटी व आयआयआयटी या केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशही याच गुणांच्या आधारे निश्चित केले जातील.
अॅडव्हान्सची पूर्वतयारी
अॅडव्हान्स परीक्षेकरिता निवड झालेल्यांना ८ ते १३ मे दरम्यान http://jeeadvonline.iitd.ac.in/ किंवा http://jeeadv.iitd.ac.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. परीक्षा शुल्क भरल्यानंतर १५ ते ३१ मेदरम्यान परीक्षेसाठीचे ओळखपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल. ते दाखविल्यानंतर संबंधित परीक्षा केंद्रांवर त्यांची ओळख तपासून त्यांना मूळ ओळखपत्र दिले जाईल.
जेईई निकालावर वादाचे सावट!
‘सामाईक प्रवेश परीक्षे’च्या (जेईई) मुख्य (मेन्स) परीक्षेत आपण गृहीत धरलेल्या गुणांपेक्षा कितीतरी कमी गुण मिळाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केल्याने ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेतील प्रवेशांसाठी पहिल्यांदाच झालेली ही प्रवेश परीक्षा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
First published on: 08-05-2013 at 03:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute cloud expected on jee results declared