नांदेडला विभागीय मुख्यालय स्थापन करण्याकरिता योग्य प्रक्रिया पार पाडली नाही या मुद्दय़ावर उच्च न्यायालयाने आयुक्तालयासाठी फेरप्रक्रिया करण्याचा आदेश दिला असला तरी अशोक चव्हाण यांच्यासाठी लातूरकरांना नाराज करण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तयारी नसल्याने नांदेड-लातूरच्या वादाचा घोळ कायम राहील अशी चिन्हे आहेत.
नांदेडला आयुक्तालय स्थापन करण्यापूर्वी हरकती, सूचना अशी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी नांदेड आयुक्तालय हा प्रतिष्ठेचा विषय असला तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अशोकरावांना झुकते माप देतील का, याबाबत काँग्रेसचे स्थानिक नेते साशंकच आहेत. गेल्या तीन वर्षांंत मुख्यमंत्री चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांना झुकते माप देण्याचे टाळले आहे. उलट, अशोक चव्हाण यांच्या काळात घेण्यात आलेले मुंबईतील काही निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द केले. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता अशोक चव्हाण यांच्या मदतीला सरकार येण्याची शक्यता कमीच असल्याची या नेत्यांची अटकळ आहे.

Story img Loader