दोन स्तंभांत २०० मीटर अंतर ठेवण्याची मच्छीमारांची मागणी

इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाखालील स्तंभांमधील अंतर किती असावे यावरून पुन्हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. दोन खांबांमधील अंतर ६० मीटर ठेवण्याच्या निर्णयावर पालिका प्रशासन ठाम आहे. मात्र बोटींना ये-जा करण्यासाठी हे अंतर १८० ते २०० मीटर रुंद असावे यासाठी मच्छीमारांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा मच्छीमार आणि प्रशासन यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिके चा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या मार्गातर्गत ३४ मीटर रुंदीचे आणि २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी वरळीच्या समुद्रात खांब उभारावे लागणार आहेत. हे खांब उभारण्याचे काम आता लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन खांबांमधील अंतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वरळीतील ज्या बंदरातून मच्छीमारांच्या बोटींची ये-जा सुरू असते. त्याच्या समोरील दोन खांबांमधील अंतर २०० मीटर ठेवावे, अशी मागणी या प्रकरणातील याचिकाकर्ते वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे नितेश पाटील  यांनी के ली आहे. या बंदरातून अंदाजे ४०० ते ५०० बोटी मासेमारीसाठी जातात. आजूबाजूला पूर्णत: खडक असल्यामुळे बोटी नेण्यासाठी मार्ग अरुंद आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. आता समुद्रात भराव टाकल्यामुळे ऑगस्टमध्ये नारळीपौर्णिमेनंतर सुरू होणारी किनाऱ्यालगतची मासेमारी बंदच होणार आहे. मग भविष्यातील मासेमारी टिकावी        म्हणून आम्हाला खोल समुद्रात जाण्याचा मार्ग तरी रुंद ठेवावा, असे पाटील यांचे म्हणणे आहे. बंदरासमोरील खांबांमधील अंतर न वाढवल्यास हे बंदर बंद होईल की काय, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

एमआरडीसीने वरळी वांद्रे दरम्यान बांधलेल्या राजीव गांधी सागरी सेतूखालील दोन खांबांमधील अंतर हे प्रत्येकी २९ मीटर आहे, तर सागरी किनारा मार्गावरील सेतूबाबत दोन खाबांमधील अंतर हे यापेक्षा दुपटीने जास्त म्हणजेच ६० मीटर म्हणजेच २०० फू ट आहे. हे अंतर मासेमारीच्या बोटींची ये-जा करण्यासाठी पुरेसे असल्याचा दावा पालिका प्रशासनातर्फे  सुरुवातीपासून के ला जात आहे.

अभ्यासासाठी समिती

६० मीटर हे पुरेसे अंतर आहे. खांबांमधील अंतराच्या मानकांप्रमाणे हे अंतर ठेवलेले आहे. सागरी किनारा मार्गाविरोधात ज्या याचिका करण्यात आलेल्या आहेत, त्या अद्याप न्यायप्रविष्ठ आहेत. त्यावेळी आम्ही ६० मीटर अंतर ठेवण्याबाबतच म्हटले आहे. तरीही मच्छीमारांच्या काही तक्रारी असतील तर नुकसानभरपाईचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. तसेच सल्लागार संस्थाही नेमण्यात येणार असून ती संस्था त्याचा अभ्यास करेल, असे सागरी किनारा मार्गाचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले.