लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित आणि कंगना राणावत अभिनित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. कंपनीच्या याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी होणार आहे.

सेन्सॉर बोर्डाने बेकायदेशीररीत्या आणि मनमानी पद्धतीने चित्रपटाचे प्रमाणपत्र रोखले आहे, असा दावा कंपनीने याचिकेत केला आहे. चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, परंतु सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे, चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्यासाठी कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर कंपनीतर्फे याचिका सादर करण्यात आली.

आणखी वाचा-वायनाडच्या भूस्खलनामुळे सणासुदीला ‘श्रीफळ’ महाग

तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयानेही कंपनीची बाजू मान्य करून याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र रोखल्याचा आरोप कंगना हिने सोमवारी केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute over emergency movie getting censor board certificate in high court mumbai print news mrj