मुंबईः मालमत्ता स्वत:च्या नावावर केल्यामुळे ५७ वर्षीय बहिणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना अंधेरी (प.) येथे घडली. महिलेला जखमी अवस्थेत कूपर रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. जुहू पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून ५४ वर्षीय आरोपीला अटक केली.

अन्वया किरण पैंगणकर (५७) असे मृत महिलेचे नाव आहे. अन्वयाच्या हत्येप्रकरणी जुहू पोलिसांनी तिचा भाऊ आशिष रघुकुल करंदीकर (५४) याला अटक केली. आरोपी आशिष करंदीकर अंधेरी पूर्व येथील लल्लूभाई पार्क रोडवरील रघुकुल सोसायटीमधील खोली क्रमांक ३७ मध्ये राहतात. अन्वया शुक्रवारी आरोपीच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी आशिष करंदीकर यांच्या बेडरूममधून अन्वया यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. आशिष करंदीकर यांचा मुलगा मृगांक करंदीकर (२१) आवाजाच्या दिशेने गेला. त्यावेळी आशिषने अन्वया यांचे केस हाताने पकडले होत. आशिष दुसऱ्या हातातील चाकू अन्वया यांच्या पोटात मारत होता. त्यावेळी मृगांक जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून घरात असलेली मृगांची बहिण व आजीही तेथे पोहोचली.

मृगांकने धाडस दाखवून वडिलांच्या तावडीतून आत्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांनी आत्याचे केस पकडले होते. ते अन्वयाचे केस ओढत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. तू जबरदस्तीने मालमत्ता तुझ्या नावावर करून घेतलीस. तू बहिण म्हणायच्या लायकीची नाहीस, तू मरायला पाहिजेस, असे आशिष बहिणी अन्वयाला बोलत होता. याबाबतची माहिती मुलगा मृगांक याने पोलिसांनी दिली.

चाकूचा शोध सुरू

या हल्ल्यात अन्वया गंभीर जखमी झाल्या. त्यांना कूपर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांकडून घटनेबाबतची माहिती घेतली. अन्वया यांचा भाचा मृगांक याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आशिष करंदीकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. जुहू पोलिसांनी आशिष करंदीकर याला बहिणीची हत्या केल्याप्रकरणी अटक केली. हत्येसाठी वापरलेल्या चाकूचा शोध सुरू आहे.

मालमत्तेवरून वाद

मृगांकने दिलेल्या माहितीनुसार, वडील मालमत्तेवरून आत्यावर नाराज होते. आत्यावर हल्ला करताना ते याबाबतच बोलत होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. हत्येनंतर कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. काही दिवसांनी घरातील इतर मंडळींकडून घटनेची सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे. घटनास्थळी कोणताही सीसी टीव्ही कॅमेरा उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून तपास करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.