मुंबई : वर्सोवा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात येथील शाखेवरून वाद सुरू झाला आहे. पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश करताच वर्सोवा येथील शाखेला टाळे लावले. यामुळे आक्रमक झालेल्या ठाकरे गटाने ते टाळे फोडत शाखा ताब्यात घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजूल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याआधी शाखेला टाळे लावत त्या शाखेची चावी स्वत:कडे ठेवली. यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी शाखेबाहेर जमले आणि यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ‘मी मार खाऊन ती शाखा बांधली आणि वाचवली आहे. न्यायालयात जाऊन ती शाखा ताब्यात घेतली होती. राजूल पटेल या नगरसेविका असल्याने त्यांना ती शाखा दिली होती. या शाखेची कागदपत्रे त्यांच्या नावावर होती. आता ती ताब्यात घेण्याबाबत पोलिसांशीही बोललो’, असे अनिल परब या वेळी म्हणाले.

दरम्यान, शाखेसाठी १९९८ मध्ये मी स्वत:च्या पैशांनी जमीन घेतली आहे. १९९९ पासून स्वत: ही शाखा बांधून काम करत आहे. २००० मध्ये शाखेवर कारवाई झाली तेव्हा छप्पर नसताना ऊन-पावसात बसून मी शाखा सांभाळली. तेव्हा विभागप्रमुख अनिल परब तिथे फिरकलेही नाहीत. परब म्हणत असतील जर ही शाखा त्यांनी न्यायालयातून वाचवली तर त्यांनी तशी कागदपत्रे दाखवावीत, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

गुजराती असल्याने महापौरपद नाकारले’

माझी महापौर होण्याची वेळ आली तरीही मला ते पद दिले गेले नाही. केवळ गुजराती असल्यामुळे हे पद नाकारण्यात आले, असा आरोप पटेल यांनी केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाने हारुन खान यांना उमेदवारी दिली. त्यांचा प्रचार केला. मात्र ते निवडून आल्यानंतर मी भाजपचा प्रचार केला, असा खोटा प्रचार त्यांनी केला. या सर्व स्थानिक कुरघोडींना कंटाळून मी हा निर्णय घेतला. माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे यांच्याबाबत कोणताही राग नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute over the location of shiv sena branch in versova mumbai news amy