पालिका आयुक्तांना रस्ते घोटाळाप्रकरणी केलेल्या पत्रप्रपंचानंतर महापालिकेत शिवसेना नगरसेवकांमध्ये दोन तट पडले असून, एका तटाचे नेतृत्व दस्तुरखुद्द महापौरांकडे आहे. तर दुसऱ्या तटात पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बहुसंख्य नगरसेवकांचा समावेश आहे.
आगामी निवडणूक लक्षात घेऊन भाजप व्यूहरचना करीत असताना शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये अस्तित्वाचा वाद सुरू झाला आहे. परस्परांना पदावरून हटविण्यासाठी आव्हान-प्रतिआव्हान देण्यात शिवसेना नगरसेवक गुंतले आहेत. याचा फायदा भाजपसह सर्वच पक्ष उठविण्याच्या प्रयत्नात आहेत.
महापौर निवासात आयोजित केलेल्या समारंभादरम्यान व्यासपीठावर पतीसमवेत केलेले नृत्य, साथीच्या आजारांबाबत केलेले वक्तव्य, महापौर निधीच्या वाटपात सर्वाचे ‘भले’ करण्याबाबत मोबाइलवर केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि आता रस्ते बांधणी कामातील रॅबिट वाहून नेण्यात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांना पाठविलेले इंग्रजी भाषेतील पत्र, अशा अनेक प्रकरणांमुळे महापौर स्नेहल आंबेकर वादग्रस्त ठरल्या आहेत. यामुळे सभागृहात विरोधकांकडून केला जाणारा गोंधळ, तसेच भाजपकडून शालजोडीतून केली जाणारी टीका अशा अनेक प्रसंगांमध्ये अधूनमधून तोंड देण्याची वेळ शिवसेना नगरसेवकांवर ओढवत आहे. महापौरांच्या बचावासाठी प्रत्येक वेळी शिवसेना नगरसेवक धावून आले आहेत. मात्र आयुक्तांना केलेल्या पत्रप्रपंचामुळे ते आता संतापले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सभागृहात विरोधक आणि भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातला तर महापौरांची पाठराखण करायची नाही, असा निश्चय शिवसेनेच्या बहुसंख्य नगरसेवकांनी केला आहे.
प्रत्येक वेळी महापौर कोणालाही न विचारता निर्णय घेतात, काहीही बरळतात असे शिवसेना नगरसेवकांचे ठाम मत बनले आहे. एखाद्या भूमिकेमुळे पक्ष अडचणीत आल्यानंतर महापौर शिवसेना भवनात धाव घेतात आणि तेथे तासनतास शिकवणी घेऊन सभागृह चालवितात. सभागृह चालविण्यापूर्वी स्वपक्षाच्या नगरसेवकांना कोणतेच मार्गदर्शन करीत नाहीत. त्यामुळे आयत्या वेळी होणाऱ्या गोंधळामुळे बाका प्रसंग निर्माण होतो. परिणामी विरोधकांचा सामना करण्याची वेळ शिवसेना नगरसेवकांवर ओढवते. सभागृहातील हे चित्र बदलण्यासाठी महापौरांनी स्वपक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, अथवा पक्षप्रमुखांनी महापौरच बदलावेत असे शिवसेना नगरसेवक बोलू लागले आहेत.
पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सोमवारच्या बैठकीतही महापौर विरुद्ध नगरसेवक असाच सामना रंगला होता. काही ज्येष्ठ नगरसेवकांनी या वादाच्या वेळी ‘नरोवा कुंजरोवा’ भूमिका घेतली, तर काही नगरसेविका आक्रमकपणे महापौरांना जाब विचारत होत्या. तर काही पदाधिकाऱ्यांना पदावरून पायउतार करण्याचा विडा महापौरांनी घेतल्याचे बोलले जात आहे. पालिकेची निवडणूक जवळ येत असताना शिवसेना नगरसेवकांमधील तट-गटाचे राजकारण चव्हाटय़ावर आल्यामुळे त्याचा फायदा करून घेण्याची व्यूहरचना भाजपसह अन्य पक्ष करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा