एसटीमधील कर्मचारी भरती परीक्षाप्रक्रियेत व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी निकाल लागण्याआधीच हस्तक्षेप केल्याने गैरप्रकार झाल्याचा वाद निर्माण झाला आहे. खुद्द कार्मिक विभागाच्याही काही अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे सांगूनही उच्चपदस्थांनी आदेश दिल्याने त्यांचाही नाईलाज झाल्याचे सांगण्यात येत आहे.
द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सुमारे साडेसहा हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ९ मार्चला परीक्षा झाली. भरतीप्रक्रियेत प्रशासनाचा हस्तक्षेप आणि गैरप्रकार होऊ नये, यासाठी खासगी यंत्रणेमार्फत ही प्रक्रिया करण्याचा निर्णय गेल्यावर्षी झाला होता. त्यानुसार पुण्यातील चाणक्य सॉफ्टवेअर सव्र्हिसेसला हे काम देण्यात आले होते. बहुपर्यायी स्वरूपाच्या लेखी परीक्षेचा निकाल संगणकामार्फत लवकर तयार होतो. तरीही अजून तो जाहीर करण्यात आलेला नाही. त्याआधीच व्यवस्थापनातील उच्चपदस्थांनी हा निकाल तपासण्याच्या बहाण्याने पुण्याला काही अधिकाऱ्यांना पाठविले. हे योग्य नसून निकालामध्ये हस्तक्षेप असल्याचा आक्षेप वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घेतला होता. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. व्यवस्थापनाकडून निकालात फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडेच केली जाणार आहे.
दरम्यान, एसटीचे महाव्यवस्थापक आर.आर. पाटील यांनी कोणतेही गैरप्रकार झाल्याचा इन्कार केला. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत उमेदवारांना परीक्षेच्या वेळीच देण्यात आली आहे. बरोबर उत्तरे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्याला किती गुण मिळतील, हे उमेदवारांना माहीत आहे. आरक्षण व अन्य बाबींच्या तपासणीसाठी काही अधिकाऱ्यांना पुण्यातील संबंधित संस्थेच्या कार्यालयात पाठविण्यात आले होते.प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी निकाल पाहिलेला नसून त्यात फेरफार होण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा