मुंबई : एकनाथ शिंदे आणि इतर १५ आमदार यांच्याविरोधात अपात्रता याचिका २४ जून रोजी दाखल झाली होती. मग शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्यासाठी ३० जूनपर्यंत उद्धव ठाकरे यांनी वाट का पाहिली, असा सवाल शिंदे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना उलटतपासणीत केला. यावर जेठमलानी यांचा सवाल फेटाळून लावत प्रभू यांनी पक्षविरोधी कृत्य होऊ नये म्हणूनच विश्वासदर्शक ठरावा वेळी पक्षादेश (व्हीप) काढल्याचे नमूद केले.
विधिमंडळात सलग सुनावणीच्या आठव्या दिवशी शनिवारी पक्षप्रमुख आणि पक्षादेश यावर जेठमलानीनी प्रश्न उपस्थित केले. ठाकरे गटाचे प्रतोद प्रभू आणि कार्यालयीन सचिव विजय जोशी यांची शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी उलटतपासणी केली. ठाकरे गटाची उलटतपासणी पूर्ण झाली असून ७ डिसेंबरपासून शिंदे गटाची उलटतपासणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत घेणार आहेत. ज्या ई-मेलवरून एकनाथ शिंदे यांना पक्षादेश पाठवला, तो मेल बनावट असल्याचा दावा जेठमलानी वारंवार करीत होते. त्यावर सुनावणी सुरू झाल्यावर विधिमंडळाची नोंदवही (डायरी) सादर करण्यात आली. यात नमूद केलेला ई-मेल आणि पक्षादेश पाठवलेला ई-मेल एकच असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.