लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी परभणी येथून निघालेला ‘लाँगमार्च’ शनिवारी नाशिक येथे स्थगित झाला. लाँगमार्च मुंबईत येण्यापूर्वी विसर्जित करण्यासाठी पोलीस आणि मंत्र्यांनी कार्यकर्त्यांवर दबाव टाकल्याचा आरोप होत असून, आंबेडकरी अनुयायांमध्ये सरकारविरोधात नाराजी आहे.
१७ जानेवारी रोजी परभणीतून या लाँगमार्चला प्रारंभ झाला होता. १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात तो पोहोचणार होता. मात्र अंबड येथे मोर्चा आला असताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने लाँगमार्चमधील कार्यकर्त्यांशी पोलीस अधिकाऱ्यांनी वाटाघाटी केल्याचे समजते. पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर लाँगमार्च स्थगित करण्यात आला. मंत्री बोर्डीकर यांच्या समवेत यावेळी भाजप आमदार सुरेश धस उपस्थित होते. लाँगमार्चमध्ये सुमारे ५०० कार्यकर्ते होते. लाँगमार्चचे नेतृत्व परभणी आंदोलनातील बळी विजय वाकोडे यांचा मुलगा आशिष करत होता. परभणी अत्याचारातील दुसरा बळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी तब्येत बिघडल्याने लाँगमार्च पूर्वीच सोडला होता. लाँगमार्चच्या स्वागताची मुंबईत जोरदार तयारी झाली होती. आंबेडकरी नेत्यांशिवाय निघालेल्या या लाँगमार्चने सरकारला कोंडीत आणले होते.
कार्यकर्त्यांवर दबाव टाकून लाँगमार्च स्थगित करण्यास भाग पाडल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीतून होत आहे. तसेच या प्रकरणी मंत्री बोर्डीकर आणि आमदार धस यांना लक्ष्य केले जात आहे. दिलेली आश्वासने महिन्यात पूर्ण न केल्यास अंबडपासून पुन्हा लाँगमार्च सुरू होईल, असे पोलिसांना आम्ही बजावलेले आहे, अशी माहिती नाशिकमधील लाँगमार्चचे आयोजक शशी उन्हाळे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पुतळ्याजवळील संविधान पुस्तिका प्रतिकृतीची मोडतोड झाल्यानंतर पुकारलेल्या बंददरम्यान पोलिसांनी आंबेडकरी वस्त्यांना लक्ष्य करत शेकडोंना मारहाण केली होती. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत तर विजय वाकोडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.