लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘आम्ही मराठी शाळेत शिकलो. पण मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या माणसांची मुले मराठी शाळेत शिकत आहेत का ? हे मला माहीत नाही. मला राजकीय बोलायचे नाही, परंतु आपण कधी समजणार आहोत की नाही ? समर्थ रामदास स्वामींच्या ‘दास म्हणे सावधान… सगळ्यांचे एक मन’ यामधून आपल्या सगळ्यांचे एक मन असल्याचा मोठा विचार मिळाला. जर सगळ्यांचे एक मन असेल, तर कायदा हातात घेऊन दुसऱ्याच्या मनावर जबरदस्ती करता येत नाही. व्यक्ती कोणती भाषा बोलतो, यामुळे वितुष्ट निर्माण होत नाही. सर्व समाज एकत्र कसा पुढे जाईल, याचा विचार केला पाहिजे’, असे मत सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिलेल्या आदेशानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँका व केंद्रीय कार्यालयांमध्ये आंदोलन सुरू केले होते. तसेच गुढीपाडवा मेळाव्यात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘मुंबईचा मामा शेलार… हाच आहे आशिष झोलार’ अशी खोचक कविता सादर करीत आशिष शेलार यांना डिवचले. त्यानंतर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील स्वरगंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाच्या लोकापर्ण सोहळ्यात समर्थ रामदास स्वामींच्या ओळींचा संदर्भ देत मनसेवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत असणाऱ्या प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील ‘स्वरगंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचा’ लोकार्पण सोहळा बुधवार, ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. दिवंगत संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे चिरंजीव ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते दृक-श्राव्य संकुलाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. तसेच याप्रसंगी सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे सुधीर फडके यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांनी ‘देव देव्हाऱ्यात नाही’, ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांनी ‘अहो सजना दूर व्हा’ आणि विकास खारगे यांनी बासरी वाजवत ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गीत सादर करून उपस्थितांना स्वरमग्न केले.
‘आमच्या मराठी शाळेत आम्ही सकाळी प्रार्थना म्हणायचो, त्यामध्ये सुधीर फडके यांच्या ‘देव देव्हाऱ्यात नाही’ या प्रार्थनेचा समावेश होता. त्यामुळे श्रीधर फडके यांना आवर्जून हे गीत गाण्यास सांगितले. देवाचा तसेच देव्हाऱ्याचा उल्लेख का करीत आहात ? असे प्रश्नही त्यावेळी नव्हते. यामधून होणारे संस्कार महत्त्वाचे होते. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाला विकास खारगे यांच्या रूपाने कलात्मक विचार, आचार आणि व्यवहार करणारा सचिव लाभला आहे’, असेही मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले. तर ॲड. आशिष शेलार यांच्या रुपाने सांस्कृतिक कार्य विभागासाठी कल्पक नेतृत्व लाभल्याचे विकास खारगे यांनी नमूद केले.
स्वरगंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाची वैशिष्ट्ये
स्वरगंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलात ध्वनीमुद्रण, आभासी चित्रीकरण (क्रोमा) कक्ष, ३६० डिग्री क्रोमा कक्ष, ५ अद्ययावत संकलन कक्ष, रंगपट – पूर्वपरीक्षण (प्रिव्ह्यू) दालन, व्हीएफएक्स व प्रशिक्षण वर्ग, कलाकारांसाठीची चेंजिंग रुम, मिनी थिएटरचा समावेश आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृक – श्राव्य संकुलाला सुधीर फडके यांचे नाव देण्याची इच्छा व्यक्त केली आणि निर्देश दिले. त्यानंतर फडके कुटुंबियांच्या परवानगीनंतर सदर सुस्सज संकुलाला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ यांचे नाव दिल्याचा आनंद आहे. तसेच या संकुलातील सर्व सोयी-सुविधा सर्वांना माफक दरात वापरता येतील, असे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.