मुंबई : मुंबईत मराठी व गुजराती हे दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्राचे हे नाते अधिकधिक दृढ व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केली. मुंबई समाचार या वृत्तपत्राला २०० वर्षे झाल्यानिमित्त स्मृती टपालसंग्रहाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी यावेळी उपस्थित होते. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी गुजराती भाषकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. मला अभिमान आहे या महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्षे पूर्ण करत आहे. हेच तर आपले प्रेम आहे. मराठी आणि गुजराती हे दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकांत व मुंबईत विरघळून गेले आहेत. मुंबई समाचारने या सगळय़ा ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातील स्वातंत्र्य लढय़ाच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा. मीदेखील वृत्तपत्र चालवतो. वृत्तपत्र चालवणे कठीण असते. वृत्तपत्र कोण कुठे चुकते याचा आरसा दाखवतात. पत्रकारांचे ते कर्तव्य असते. मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे.
काही वृत्तपत्रे ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्रालाही १४१ वर्षे झाली आहेत. याच लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा जाब ब्रिटिश सरकारला विचारला होता. मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत, असे ठाकरे यांनी नमूद केले.
मुंबई समाचारने यापुढे देखील आणखी १००, २०० वर्षे पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. गुजराती आणि मराठीचे नाते अधिकाधिक दृढ व्हावे हीच माझी यानिमित्ताने सदिच्छा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशात व्यासंगी चर्चेचे वातावरण सुदृढ व्हावे -पंतप्रधान
देशात व्यासंगी आणि बहुआयामी चर्चेचे वातावरण अधिक सुदृढ व्हावे. ती भारताची ओळख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मुंबई समाचार’च्या द्विशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. माध्यमे आणि संसद किंवा विधिमंडळे यांचे देशाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. प्रसिद्धी माध्यमे कार्यकारी यंत्रणेवर सुदृढ टीकेचे काम करीत आहेत व आपली देशाबाबत असलेली जबाबदारी पार पाडत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले.