मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाडजवळ तळीये येथील दरड दुर्घटनेतील ६६ कुटुंबांची पक्क्या घरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात या दरडग्रस्तांना घरांचे वितरण करण्यात येणार आहे.
तळीये कोंढाळकरवाडी येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली आणि हाहाकार उडाला. दुर्घटनेत ६६ घरे गाडली गेली आणि ८७ ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले. यापैकी सुमारे ५४ जणांचे मृतदेह सापडले. उर्वरित मृतदेह ढिगाऱ्याखालीच गाडले गेले. या दुर्घटनेत बाधित झालेल्या ६६ पैकी २५ कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी कंटेनरमध्ये करण्यात आले. उर्वरित कुटुंबांनी आपल्या निवाऱ्याची सोय इतरत्र केली होती. या ६६ दरडग्रस्तांसह तळीयेतील धोकादायक परिसरातील १९७ घरांमधील कुटुंबीयांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भूसंपादनाची जबाबदारी रायगड जिल्हाधिकाऱ्यांवर, घरांच्या बांधकामाची जबाबदारी म्हाडाच्या कोकण मंडळावर, तर प्रकल्पातील पायाभूत सुविधा विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपविण्यात आली. रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली १४.६४ हेक्टर जागेवर २६३ घरांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि कामास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात २६३ पैकी २०० घरांच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यापैकी ६६ घरांचे काम प्राधान्याने पूर्ण करून बाधितांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता.
हेही वाचा >>>राज्यसभा, विधान परिषद निवडणूक :पवार, ठाकरे गटांपुढे संख्याबळाचे आव्हान
कोकण मंडळाने घरांचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा ताबा घेणे अपेक्षित होते. मात्र काही कारणाने यास विलंब झाला. आता ६६ घरांचे काम पूर्ण झाले असून ५ जानेवारी रोजी या घरांचा ताबा देण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.
स्वतंत्र कार्यक्रमासाठी आग्रह
माणगाव येथील लोणेरे गावात ५ जानेवारी रोजी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तळीयेतील दरडग्रस्तांना घरांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. म्हसे यांनी दिली. हक्काचे घर मिळणार असल्याने कोंढाळकरवाडीत आनंदाचे वातावरण असले तरी काहीशी नाराजीही आहे. प्रकल्पस्थळी स्वतंत्र कार्यक्रमात घरांचे वितरण व्हावे अशी आपली इच्छा असून सरकारने याबाबत विचार करावा, अशी भूमिका एका दरडग्रस्ताने मांडली.