मुंबई : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळीतील ८४२ पात्र रहिवाशांना मंगळवारी पुनर्वसित इमारतींमधील घरांची हमी देण्यात आली. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मंगळवारी पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी संगणकीय पद्धतीने सोडत काढून रहिवाशांना हमी दिली. आता या पात्र रहिवाशांबरोबर लवकरच करार करून त्यांना घरभाडे वा शक्य असल्यास संक्रमण शिबिराचे गाळे वितरीत करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांची घरे रिकामी करण्यात येतील.

हेही वाचा >>> मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गारेगार प्रवास निर्विघ्न

बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांची घरे रिकामी करून घेण्यापूर्वी त्यांना कोणत्या पुनर्वसित इमारतीत, कितव्या मजल्यावर आणि किती क्रमांकाचे घर मिळणार हे आधीच सोडतीद्वारे निश्चित करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील पात्र रहिवाशांना सोडतीद्वारे घराची हमी देण्यात आली आहे. अजूनही मोठ्या संख्येने बीडीडीतील इमारती रिकाम्या करून घेणे शिल्लक आहे. त्यामुळेच एकीकडे मुंबई मंडळाने पात्रता निश्चिती करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. तर दुसरीकडे सोडत प्रक्रियेलाही वेग दिला आहे. त्यानुसार मंगळवारी वरळी बीडीडीतील पुनर्वसित इमारतीतील ८४२ घरांसाठी सोडत काढण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. इमारत क्रमांक १८,१९,२०, ५९, ६०,६१,७८,७९,८०, ८१ आणि ८२ अशा ११ इमारतींमधील पात्र रहिवाशांसाठी ही सोडत काढण्यात आली. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करून इमारती रिकाम्या करण्यात येतील.