मुंबई : विकास या संकल्पनेला असलेले देखलेपणाचे वेष्टन बाजूला काढून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक जागतिक निकषांच्या आधारे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे मूल्यमापन करणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘जिल्हा निर्देशांक’ उपक्रमाचा सोहळा येत्या १२ मार्च रोजी मुंबईत पार पडणार आहे. निर्देशांकानुसार सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कोणत्याही प्रांत, राज्य, देशाचा विकास हा निश्चित मापन प्रक्रियेने मोजल्यास त्याला प्रमाणबद्ध रूप लाभते. आपल्या देशात राज्य आणि केंद्र पातळीवर अशा मापनासाठीचे निकष, निर्देशांक ठरलेले असले तरी जिल्ह्यांच्या पातळीवर त्याची उणीव भासते. ही उणीव दूर करून जिल्ह्यांच्या प्रगतीला मापदंड मिळवून देण्यासाठी ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष. सारस्वत बँक प्रस्तुत या उपक्रमाचे  ‘नॉलेज पार्टनर’ पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक व सांख्यिकी संचालनालयाकडून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीचा प्रामुख्याने आधार घेऊन जिल्हा निर्देशांकाची मांडणी करण्यात येते. सकल उत्पादन, औद्योगिकीकरण, सेवा क्षेत्राचा विस्तार, रोजगार, उद्योगांमधील गुंतवणूक, आर्थिक पायाभूत् सुविधा, शाळांची संख्या, दहावीतील विद्यार्थिसंख्या, पंतप्रधान आवास योजनेतील घरबांधणीचा वेग, दरडोई वीजवापर, पाच  वर्षांपर्यंतची सामान्य वजनाची बालके, लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस चौक्या- रुग्णशय्या यांची संख्या अशा एकूण १२ निकषांना यासाठी विचारात घेण्यात येते.

याखेरीज संयुक्त राष्ट्रांनी आखून दिलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी (एसडीजी) दोन उद्दिष्टांना विचारात घेऊन त्याआधारेही जिल्ह्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यांच्या केवळ आर्थिक विकासाचाच नव्हे तर सामाजिक, पायाभूत, शैक्षणिक विकासाचा उलगडाही या निर्देशांकातून होतो. अतिशय क्लिष्ट सांख्यिकीचे प्रमाणीकरण आणि सुलभीकरण करून तयार करण्यात आलेल्या या निर्देशांकाला अंतिम रूप देण्याचे काम सध्या सुरू आहे.

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, केंद्रीय वित्त आयोगाचे माजी सदस्य आणि ‘अर्थ ग्लोबल’चे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष, ‘आयएसईजी’ फाऊंडेशनचे संस्थापक भागीदार आणि संचालक डॉ. शिरीष संख्ये, महाराष्ट्राच्या आर्थिक व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक कृष्णा फिरके, गोखले संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवा रेड्डी, साहाय्यक प्राध्यापिका डॉ. सविता कुलकर्णी अशी तज्ज्ञांची समिती या निर्देशांकावर शिक्कामोर्तब करेल.

जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

येत्या १२ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या सोहळ्यात या निर्देशांक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच निर्देशांकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा या वेळी सन्मानदेखील करण्यात येणार आहे.

Story img Loader