चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत-खोपोली-कसारा दरम्यानच्या विद्युत यंत्रणेमध्ये बदल करण्यात येत असला तरी ही यंत्रणा वापरणाऱ्या सिग्नल यंत्रणेत पूर्ण बदल झाले नसल्यामुळे सिग्नल्स बंद पडण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. सिग्नल्सना विद्युत पुरवठा करणाऱ्या पॉइंट्सची देखभाल नियमित होत असली तरी तांत्रिक बिघाड होऊ शकतो, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जुना विद्युत भार सहन करणारे सिग्नल्स आणि पॉइंट्स न बदलल्यामुळे सिग्नल्स बंद पडून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढत आहे.
पश्चिम रेल्वेवर गुरुवारी रात्री विद्युत पुरवठा अचानक बंद झाल्याने सर्व सिग्नल्स बंद पडले होते. तर शुक्रवारी दुपारी पॉइंट्स फेल झाल्याने सिग्नल्स बंद पडून मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अनेकदा अल्प काळासाठीही सिग्नल्स बंद पडतात आणि वाहतूक विस्कळीत होत असते. १५०० व्होल्टच्या विद्युतप्रवाहाऐवजी २५ हजार व्होल्टचा प्रवाह वाहून नेणारी यंत्रणा बदलण्याचे काम काही वर्षे सुरू आहे. दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी मेगा अथवा जम्बो ब्लॉक घेऊन तेथील सर्व यंत्रणा आधुनिक करण्याचे कामही काही वर्षांपासून सुरू आहे. विद्युत यंत्रणा पश्चिम रेल्वेवर पूर्णपणे बदलली असली तरी मध्य रेल्वेवर हे काम पूर्ण झालेले नाही. उपनगरी रेल्वेच्या परिसरातील विद्युत यंत्रणेत बदल करण्यात आला असला तरी अनेक ठिकाणी पॉइंट्स आणि सिग्नल्स अद्यापही जुन्या विद्युत यंत्रणेचा भार वाहणारे आहेत. यामुळे अधिक व्होल्टचा प्रवाह सुरू झाला तर यंत्रणा एकदम बंद पडते. रेल्वे मार्गाशेजारी असलेल्या सिग्नल्सच्या खांबाशेजारी काही अंतरावर एक छोटी लोखंडी पेटी असते. या पॉइंटमध्ये विद्युतप्रवाह सतत येत असतो आणि त्यावर सिग्नल्सचे काम सुरू असते. या पेटीमध्ये विद्युतप्रवाहावर आधारित एकमेकांमध्ये अडकवलेली चक्रे फिरत असतात. कधीकधी ही चक्रे अचानक एकमेकांमध्ये अडकतात आणि विद्युतप्रवाह खंडित होतो. ही चक्रे बंद होऊ नयेत यासाठी त्याची कायम देखभाल होत असते, असे रेल्वेचे म्हणणे आहे. यंदाच कुर्ला येथील सिग्नल यंत्रणेमध्ये मोठा विद्युतप्रवाह अचानक आल्याने मोठी आग लागली होती.
पॉइंटसमध्ये असलेल्या धातूच्या चकत्या तसेच वीजवाहक तारांमधील तांब्याच्या तारा काढण्याचा प्रयत्न अनेकदा गर्दुल्यांकडून होत असतो. त्यामुळेही सिग्नल्स बंद पडू शकतात, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे पाणी किंवा धूळ सतत गेल्यामुळेही लोखंडी पेटीतील चक्रे बंद पडतात. परिणामी सिग्नल्स बंद पडतात आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा