बारावीच्या परीक्षांचे कारण पुढे करुन हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष शरद राव यांनी ‘भारत बंद’मधून एक दिवस काढता पाय घेतल्यामुळे कामगार संघटनांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कामगारांच्या एकजुटीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद राव यांना ‘भारत बंद’मध्ये फेरफार करण्याचा अधिकार नाही, असे टीकास्त्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीने सोडले आहे.
केंद्रीय कामगार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २० व २१ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. मात्र २१ फेब्रुवारीपासून १२ वीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपण केवळ २० फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’मध्ये सहभागी होणार असल्याचे शरद राव यांनी जाहीर केले. शरद राव यांचा हा निर्णय कामगारांच्या एकजुटीला मारक ठरणारा आहे. पालक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी २१ फेब्रुवारी रोजी होणारी १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती सरकारला करण्यात आली होती. मात्र सरकारने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले, असा आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक ए. डी. गोलंदाज यांनी केला आहे.
परीक्षा पुढे ढकलण्यासाठी शरद राव यांनी सरकारवर दबाव टाकायला हवा होता. पण तसे न करता त्यांनी ‘भारत बंद’मधून काढता पाय घेतला. नवी दिल्ली येथे झालेल्या सर्व केंद्रीय कामगार संघटना, कामगार संघटना, महासंघ व स्वतंत्र संघटनांच्या राष्ट्रीय परिषदेस शरद राव उपस्थित होते. दोन दिवस ‘भारत बंद’ आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली होती. असे असताना आता त्यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या या कृतीचा कृती समितीकडून निषेध करण्यात आला आहे.
दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जिजामाता उद्यानाजवळून आझाद मैदानावर कामगारांचा ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे. या ‘लाँग मार्च’सह २० व २१ फेब्रुवारी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेना महासंघ आणि संलग्न संघटनांनी घेतला आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी मोठय़ा संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी केले आहे.