मुंबई : वैविध्यपूर्ण आशयाला प्रयोगशीलतेची जोड देत ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेच्या मुंबई विभागीय प्राथमिक फेरीच्या पहिल्या टप्प्यात लक्षवेधी एकांकिका सादर झाल्या. कल्पनेच्या भराऱ्या घेत आणि सभोवताली घडणाऱ्या घडामोडींची जाणीव ठेवत, युवा रंगकर्मींनी एकांकिकांची बांधणी केली होती. मुंबई विभागीय प्राथमिक फेरीचा दुसरा टप्पा रविवार, ८ डिसेंबर रोजी रंगणार असून, एकूण पाच एकांकिकांचे सादरीकरण या वेळी होणार आहे.
मुंबई विभागीय प्राथमिक फेरीच्या पहिल्या टप्प्यात विषयांचे वैविध्य पाहायला मिळाले. रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाने रामचंद्र गावकर लिखित आणि दिग्दर्शित ‘जनता नगरचे लंगडे घोडे’ या एकांकिकेचे सादरीकरण करत आर्थिक सत्तेच्या जोरावर सर्वसामान्यांवर होणारा अन्याय आणि टाकल्या जाणाऱ्या दबावावर भाष्य केले. मुलाच्या हट्टापायी बापाने केलेल्या जुगाडाची गोष्ट गुरू नानक खालसा महाविद्यालयाने सिद्धेश साळवी लिखित आणि आर्यन शिर्के व सिद्धेश साळवी दिग्दर्शित ‘जुगाड लक्ष्मी’ या एकांकिकेतून मांडली. तर मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाने शेतकऱ्याच्या आयुष्यात अनेक वर्षांपासून बरोबर असणाऱ्या झाडाचे गुपित उलगडण्याची गोष्ट सिद्धेश साळवी लिखित आणि अमित पाटील दिग्दर्शित ‘झाड काय कळलं नाय’ या एकांकिकेतून मांडली.
हेही वाचा >>>Actor Vijay on Ambedkar: “आंबेडकरांचीही मान आज शरमेने खाली झुकली असती…”, तमिळ अभिनेता विजयचं मोठं विधान
‘पोर्ट्रेट’ हे दिसते; त्यापेक्षा ते कसे असते, हे दाखविण्यासाठी कसदार अभिनयाच्या जोरावर चित्रमय प्रयत्न सर ज. जी. कला, वास्तुकला आणि अभिकल्प विद्यापीठाने रोहन कोळी लिखित व दिग्दर्शित ‘पोर्ट्रेट’ या एकांकिकेतून केला.
आपण नेहमी आपल्याकडे काय नाही आहे, याकडे बघत राहिल्याने काहीतरी नवीन घडवायला विसरून तिथेच राहतो. त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींमध्ये माणसाने वेगळे करायला हवे, असा संदेश सिद्धार्थ महाविद्यालयाने (आनंद भवन) अजय पाटील लिखित आणि रोहित मोरे व रोहन हर्षवर्धन दिग्दर्शित ‘होम मेड खानावळ’ या एकांकिकेतून दिला.
दुसऱ्या टप्प्याची उत्सुकता
●राज्यातील युवा रंगकर्मींना कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेबाबत विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यासाठी महाविद्यालयीन संघ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रयोगस्थळी पोहोचले होते.
●बाहेरील सर्व विचार दूर सारून सादरीकरणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रार्थनेने एकांकिकेची सुरुवात, एकमेकांना प्रोत्साहित करणे, सादरीकरणाचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी एकाग्रता, पुढील प्रसंगासाठी तयार राहणे आणि नेहमीप्रमाणे विंगेत सुरू असलेली लगबग तसेच सतर्कता या वेळी पाहायला मिळाली. आता दुसऱ्या टप्प्यातही मुंबईतील महाविद्यालयांकडून कशा पद्धतीच्या एकांकिका सादर होणार, याची उत्सुकता आहे.
प्रायोजक
●मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
●सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
●सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
●पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स
●साहाय्य : अस्तित्व
●टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स