उत्तर प्रदेशातील सत्ता ताब्यात घेण्यापर्यंत मजल मारलेल्या बहुजन समाज पक्षाचा पाया असणाऱ्या आणि त्या पक्षाला अर्थबळ व बुद्धिजिवी मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘बामसेफ’ या सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेलाच फुटीने ग्रासले आहे. बसपचे संस्थापक कांशिराम यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या केडर बेस्ड व भूमिगत काम करणाऱ्या या संघटनेत फूट पडून आठ-दहा गट उदयाला आले आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या काही कार्यकर्त्यांनी प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावत बामसेफचीच पुनर्रचना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्रात १९७०च्या दशकात दलित पॅंथरचा झंझावात सुरू असतानाच, केवळ आक्रमक भाषणे करून शोषितांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यासाठी राजकीय सत्ता हातात घेण्याची गरज आहे, त्याकरिता वेगवेगळ्या स्तरावर संघटना बांधणीची आवश्यकता लक्षात घेऊन कांशिराम, डी. के. खापर्डे व अन्य काही नेत्यांनी पुढाकार घेऊन बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन अर्थात ‘बामसेफ’ची स्थापना केली. मागासवर्गीय व अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे हे या संघटनचे उघड उद्दिष्ट असले, तरी बहुजनांचा राजकीय पक्ष चालवायचा तर त्यासाठी पैसा आणि मनुष्यबळ हवे हा उद्देशही त्यामागे होता. त्यानुसार संघटनेने केंद्र सरकारी, रेल्वे, संरक्षण, विमा, बँका इत्यादी क्षेत्राबरोबरच राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला, त्याच्या आधारावर १९८४ मध्ये बसपची स्थापना करण्यात आली. सुमारे एक लाखाच्या वर सदस्य असलेल्या बामसेफने थेट राजकीय भूमिका घेतली नसली तरी ही संघटना बसपचा भक्कम पाया मानला जात होता.
अलीकडे मात्र आरपीआयच्या फुटीचाच शाप याही संघटनेला लागला आहे. नेतृत्वाच्या स्पर्धेतून व अहंकारातून आरपीआयचे किती तुकडे झाले हे मोजता येणेही कठीण आहे, त्याच दिशेने बामसेफचीही वाटचाल सुरू आहे. बामसेफमध्ये सध्या आठ-ते दहा गट उदयास आले आहेत, त्यामुळे गेली अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यातून संघटनेत आता वेगळाच विचार सुरू झाला आहे. प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान देत बामसेफच्या ऐक्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील विविध गटांतील सुमारे ४०-५० ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २ व ३ मार्चला मुंबईत दोन दिवसांचे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात विविध गटांचे ऐक्य करून बामसेफची मूळ उद्दिष्टावर व ध्येयावर पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बसपला अर्थबळ व मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘बामसेफ’मध्ये फूट
उत्तर प्रदेशातील सत्ता ताब्यात घेण्यापर्यंत मजल मारलेल्या बहुजन समाज पक्षाचा पाया असणाऱ्या आणि त्या पक्षाला अर्थबळ व बुद्धिजिवी मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘बामसेफ’ या सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेलाच फुटीने ग्रासले आहे.
आणखी वाचा
First published on: 11-02-2013 at 02:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Division in bamsef who is supplier of finance and workers supplier to bsp