राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांमधील फुटीचे दर्शन घडले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधान भवनाच्या आवारात शिवसेना-भाजपच्या आमदारांनी रिकामे हंडे व सुकलेला चारा घेऊन सरकारच्या विरोधात निदर्शने केली. तर बाजुलाच मनसेच्या आमदारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून मराठी भाषेला डावलल्याचा निषेध म्हणून राज्यपालांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांच्या अभिभाषणाला सेना-भाजपत्या सदस्यांनी हजेरी लावली, तर मनसेने बहिष्कार टाकून विरोधकांमध्येच त्यांनी सवतासुभा मांडला.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आधीच सेना-भाजपच्या आमदारांनी रिकामे हंडे व सुकलेल्या चाऱ्यांच्या पेंडय़ा घेऊन विधानभवनाच्या आवारात प्रवेशद्वारासमोरच निदर्शने केली.
पाणी द्या, चारा द्या अशा घोषणा देत त्यांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला. त्यावेळी विधानभवनात जाण्याची घाई झालेल्या मंत्र्यांची व सत्ताधारी सदस्यांची चांगलीच तारांबळ उडाली.  संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही विरोधकांनी घेरले, परंतु त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाचे हसतमुखाने स्वागत केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ दूरूनच हा सारा प्रकार पाहून खुदुखुदु हसत होते. पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे आगमन होताच, विरोधी आमदारांनी त्यांच्यासमोर हंडे धरुन दुष्काळग्रस्तांना पाणी द्या, असा एकच गलका सुरु केला. त्यामुळे ढोबळे यांना आंगावर आलेल्या त्या गर्दीतून कशी तरी वाट काढत विधानभवनात प्रवेश मिळवावा लागला.
सेना-भाजपचे इकडे दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलन सुरु असतानाच, त्यांच्या बाजुला मनसेच्या आमदारांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मराठीला वगळण्याचा निषेध म्हणून निदर्शने सुरु केली. अभिभाषणासाठी विधानभवनात येणाऱ्या राज्यपालांची गाडी अडवून त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांच्या अभिभाषणाला सेना-भाजचे सदस्य हजर राहिले तर, मनसेच्या आमदारांनी बहिष्कार टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा