ठाण्याचे तीन किंवा चार जिल्हे व्हावेत, असा काहीजणांचा आग्रह असला तरी दोनच जिल्हे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून येत्या १ मे रोजी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ठाण्यात दिली. तसेच एसटी कामगारांच्या समस्यांबाबत मनसेने काढलेल्या मोच्र्याचा खरपूस समाचार घेत त्यांनी मागण्या मान्य होत आल्यावर श्रेय लाटण्यासाठी काही संघटना मोर्चे काढतात, त्या मध्येही पक्षाचे कार्यकर्ते असतात, असा टोला लगावला.
साकेत येथील ठाणे पोलीस क्रीडा संकुलावर २५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत, पालकमंत्री गणेश नाईक, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ, ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्यासह राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. येत्या २६ जानेवारीला जिल्ह्य़ाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होता. मात्र, त्यात काही अडचणी असून अनेक प्रस्तावही आले आहेत. त्यावर चर्चा करून घेतलेला निर्णय योग्य ठरेल. त्यामुळे येत्या १ मेपर्यंत जिल्हा विभाजनाची घोषणा होण्याची शक्यता आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील पोलीस तणावाखाली असून चालणार नाही, पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे अप्रवृत्ती तणावाखाली आली पाहिजे. कामाच्या ताणामुळे त्यांच्या आरोग्यवर परिणाम होतो. मात्र, आपले आरोग्य आपल्यालाच संभाळावे लागणार असून त्यासाठी नियमित योगासन, व्यायाम, सकस आहार आणि खेळाशी जोडून घेतले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला. शासन आणि जनता यांच्यातील दुवा पोलीस आहेत. त्यामुळे पोलिसांना निरोगी, सुदृढ व कार्यक्षम करण्याची गरज असून क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून ती बऱ्याच अंशी पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी दरवर्षी पैसे जाहीर होतात पण, ते मिळत नसल्याचे पोलीस महासंचालकांनी मला सांगितले. मात्र, अशा स्पर्धेसाठी दोन कोटी जाहीर करीत असून ते शंभर टक्के तुम्हाला मिळतील, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. तसेच पोलीस खात्यासंबंधी आकस्मित निधीची फाईल दोन दिवसांपुर्वी मंजुरीसाठी आली होती, त्यावर दहा कोटींचा आकडा होता, तो २० कोटी करून फाईल मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.