गेल्या काही वर्षांमधील आकडेवारीवर नजर टाकली तर मराठी कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. अनेक सुशिक्षित आणि चांगल्या घरांतील जोडपी लग्नानंतर सहाच महिन्यांत एकमेकांपासून विलग होताहेत, असे निरीक्षण दिग्दर्शक सतीश राजवाडे याने नोंदवले.
एकमेकांचे स्वभाव पटत नसताना केवळ लग्न निभावण्यासाठी एकत्र राहण्यापेक्षा वेगळे होण्याचा पर्याय निवडला जातो, पण घटस्फोट झाला म्हणजे नातेच संपले असे म्हणण्यापेक्षा एक मेकांच्या भावनांचा आदर करत मैत्रीचे नाते टिकवले जाऊ शकते, हा विचार मला प्रेमाची गोष्टमधून मांडायचा आहे, असे सांगत सतीशने प्रेमभरी मैफल जमवली. सतीशची ‘प्रेमाची गोष्ट’ पडद्यावर रंगवणाऱ्या अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे आणि या कथेला शब्दरूप देणाऱ्या चिन्मय केळकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात भेट देत ‘गुजगोष्टी’ केल्या.
‘प्रेमाची गोष्ट’ कशी घडत गेली, अतुल कुलकर्णीसारख्या अत्यंत संवेदनशील अभिनेत्याला ही गोष्ट का साकाराविशी वाटली, मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सागरिका घाटगेने याच चित्रपटाची निवड का केली, चिन्मय केळकरला या ‘गोष्टी’ची पटकथा कशी उलगडली, अशा अनेक प्रश्नांची अत्यंत दिलखुलास उत्तरे या चौघांनीही दिली.
पूर्वीच्या काळी स्त्रिया या आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसल्याने संसारात पुरुषांचाच शब्द अंतिम होता. मात्र स्त्रिया स्वतंत्र व्हायला लागल्यानंतर त्यांच्याही मतांना किंमत देणे महत्त्वाचे ठरत आहे. यामुळे पुरुषांच्या मनात साहजिक असुरक्षिततेची भावना डोकावत आहे आणि त्यामुळेच कदाचित घटस्फोटांचे प्रमाण वाढले असावे, असे निरीक्षण सतीशने नोंदवले. ही गोष्ट आपल्या मनात आल्यानंतर आपण गेल्या काही वर्षांतील घटस्फोटांच्या प्रकरणांकडे नजर टाकली. गेल्या काही वर्षांत मराठी कुटुंबांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या वाढल्याचे जाणवले. विशेषत: मध्यमवर्गीय, सुशिक्षित जोडप्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे, असेही सतीशने सांगितले.