मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दिवाळीच्या बाजारपेठा फुलल्या आणि खरेदीला जोर आला. बच्चेकंपनीचे आकर्षण असलेल्या फटाक्यांच्या दुकानांमध्येही गर्दी दिसत असून यंदा ‘फायर एग’ हा फटाका विशेष भाव खात आहे. याबरोबरच माचिस बंदुक, बॅट अँड बॉल या फटाक्यांनाही खास पसंती आहे.
यंदा अवकाळी पावसामुळे फटाक्यांच्या व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागला. मात्र, आता बाजारांमध्ये पुन्हा फटाक्यांचा धुमधडाका सुरू झाला आहे. परीक्षा संपल्याने पालकांची फटाके खरेदी करण्याची लगबग सुरु झाली आहे. बाजारात आलेले नवनवीन आणि पर्यावरण पूरक फटाके खरेदी करण्याकडे मागील दोन दिवसांपासून कल वाढला आहे. नेहमीच्या फटाक्यांबरोबरच चित्रपटांतील पात्रांवर आधारित अनेक फटाके बाजारात दाखल झाले आहेत. मडगाव एक्स्पेस चित्रपटातील ‘कंचन कोंबडी’वर बेतलेला फायर एग फटाका ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. यात कोंबडीच्या चेहऱ्यासमोर असलेली वात पेटविल्यानंतर कोंबडीच्या मागच्या बाजूला असलेला फुगा फुगतो व ही कोंबडी आवाज करत पुढे जाते. हा गंमतीशीर फटाका लहान मुलांना विशेष आवडतो आहे. एका खोक्यात हे २ फटाके असतात आणि त्याची किंमत १५० रुपये आहे. ‘माचिसच्या बंदुकी’त मागच्या बाजूला आगपेटीची काडी टाकून बंदूक चालवली की त्याचा केपा फुटल्याप्रमाणे आवाज येतो. याची किंमत १०० रुपये असून यामुळे मुलांना चटका लागल्याची शक्यता नाही. ‘ बॅट अँड बॉल’ हा खास क्रिकेट प्रेमींसाठी असलेला फटाका आहे. बॅटच्या खाली बॉल जोडलेला असतो. फुलबाजाच्या मदतीने बॉलला असलेली वात पेटवल्यावर रंगीबेरंगी धूर बाहेर येऊन बॅटला असलेली कडी उघडते आणि त्यानंतर बॅट फुलबाजा प्रमाणे पेटते.
हेही वाचा : १९ लाख हेक्टरवर नुकसान, राज्यातील शेतीला परतीच्या पावसाचा मोठा फटका
फटाके २५ ते ३० टक्के महाग
पावसामुळे यंदा फटाके २५ ते ३० टक्क्यांनी महागले आहे. शिवाय विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मोर्चे, मिरवणुका आणि सभांमध्ये फटाक्यांचा वापर होणार आहे. निकालावेळीही फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. याचा परिणाम फटाक्यांच्या दरावर झाल्याचे विक्रेता लक्षदीप वीरदास यांनी सांगितले.