पीटीआय, मुंबई/नवी दिल्ली
रस्त्यावर वाहनांमुळे वाहतूक कोंडी… तयार कपड्यांची दुकाने तोबा गर्दी… फटाके, मिठाईच्या दुकानाबाहेर रांगा… दरवर्षी दिवाळीदरम्यान प्रत्येक शहरात आणि गावात दिसणारे हे दृश्य. यंदाचे वर्ष त्याला अपवाद नाही. दिवाळीनिमित्त स्वत:साठी खरेदी तर होतेच, मात्र पाडवा-भाऊबीज या दिवशी आप्तांना भेटवस्तू देण्यासाठीही अनेकांची पावले बाजारपेठांकडे वळतात. त्यात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ई-ट्रेडिंग कंपन्यांनी उत्सवानिमित्त सवलती जाहीर केल्यामुळे तेथील विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सोने-चांदीच्या चढ्या दरांमुळे यंदा मौल्यवान धातूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल कमी असला तरी चारचाकी आणि दुचाकी वाहने, मोठे टीव्ही, फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटर, मोठ्या आकाराची वॉशिंग मशीन यांसारख्या घरातील रोजच्या वापराच्या वस्तू यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. याबरोबरच वीज वाचविणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित वस्तूंना मागणीही वाढल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे (पान ८ वर) (पान १ वरून) महानगरांबरोबरच दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्येही महागड्या वस्तूंची मोठी बाजारपेठ असल्याचे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चितकारा यांनी सांगितले. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे सणासुदीनिमित्त खरेदीला अधिक जोर असल्याचे गोदरेज अप्लायन्सेसचे व्यापार प्रमुख कमल नंदी म्हणाले. इलेक्ट्रॉनिक आणि गृहपयोगी वस्तू उत्पादकांची संघटना ‘सीमा’ने यंदाच्या दिवाळीत विक्रीमध्ये २० टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. या महागड्या वस्तूंबरोबरच फॅशनेबल तसेच रोजच्या वापराचे कपडे, मिठाई, फटाके, हार-फुले यांचीही नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

हेही वाचा : ५० लाख नवे मतदार, चार जिल्ह्यांत महिला मतदारांची संख्या अधिक

‘गिफ्ट कार्ड’चीही चलती

अनेकदा मोठी वस्तू भेट द्यायची असेल, तर तिच्या खरेदीपासून ते वाहतुकीपर्यंत अनेक अचडणी असतात. त्यामुळे अलीकडे अनेक ग्राहक ‘गिफ्ट कार्ड’ला पसंती देत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. ई-ट्रेडिंगमधील अनेक कंपन्यादेखील अशी ‘गिफ्ट कार्ड’ उपलब्ध करून देतात. ईमेल किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ही कार्ड पाठविता येतात आणि भेटवस्तू स्वीकारणारी व्यक्ती त्याद्वारे खरेदी करू शकते.

हेही वाचा : दर्जेदार, वाचनीय साहित्याचा ‘दिवाळी फराळ’, ‘लोकसत्ता’ दिवाळी अंक प्रकाशित

सोने १००० रुपयांनी महाग

गेल्या वर्षभरात वाढलेल्या दरांमुळे सणासुदीला सोन्याच्या विक्रीत अल्प घट झाली असली, तरी वाढलेल्या मागणीमुळे बुधवारी सोने १ हजार रुपयांनी महागले. दिल्लीच्या सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर ८२ हजार ४०० रुपये होता. पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त खरेदीत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून सराफांनी केलेली खरेदी आणि भूराजकीय परिस्थितीमुळे जागतिक बाजारात सोन्याला वाढलेली मागणी, यामुळे मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.