अधिक महिन्यामुळे दिवाळी महिनाभर उशिरा येऊनही मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ात थंडीची फारशी चाहुल यंदा अभ्यंगस्नानाच्या दिवशी जाणवली नाही. उलट मंगळवारी पहाटे किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात गेल्याने मुंबईकरांना घाम पुसतच अभ्यंगस्नान करावे लागले. दक्षिणेतील चक्रीवादळानंतर वातावरणात झालेले बदल आणि उत्तरेकडून थंड वारे येण्यात निर्माण झालेले अडथळे यामुळे मुंबईतील कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे, असे कुलाबा वेधशाळेच्या संचालकांनी सांगितले.
एक-दोन आठवडय़ांपूर्वी हवेत किंचित सुखद गारवा जाणवू लागत असतानाच दक्षिणेकडील राज्यांमध्ये चक्रीवादळ व पाऊस झाला. मुंबईसह राज्यात तापमान घसरण्यासाठी उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरळीत राहणे अपेक्षित असते. पण त्यात अडथळे असल्याने तापमान वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई व परिसरात १९-२० अंश सेल्सिअस इतके असलेले किमान तापमान मंगळवारी पहाटे आणखी वाढले असून ते २३-२४ अंशापर्यंत गेले होते. कमाल तापमानही वाढले असून ते ३४-३५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.
त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यावर आलेल्या दिवाळीत थंडी अपेक्षित असताना अजूनही उकाडा आणि घामाच्या त्रासाला मुंबईकरांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच नोंदले गेले असून सोमवारी सर्वात कमी तापमान परभणी येथे १४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यामुळे थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता असून किमान तापमानात घट अपेक्षित असल्याचे वेधशाळेच्या संचालकांनी स्पष्ट
केले.