लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : बेस्ट उपक्रमातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळत नसल्याने, त्यांनी रविवारी ‘काम बंद’ची हाक दिली होती. या ‘काम बंद’ आंदोलनाला बेस्ट उपक्रमातील कोणत्याही कामगार संघटनांनी पाठिंबा दिला नाही. मात्र, या संघटनांचे आपापसातील वादच यानिमित्ताने चव्हाट्यावर आले. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केल्यानंतर, दुसऱ्या दिवशीच मुंबई महानगरपालिकेने बेस्टच्या खात्यात ८० कोटी पाठवून, पुढील दोन दिवसांत बोनसचे पैसे बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकारी वर्गाला दिवाळी सणापूर्वी बोनस मिळाला. मात्र, बेस्ट उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी वर्गाला दिवाळी संपली तरीही बोनस मिळाला नाही. त्यामुळे, रविवारी बेस्ट उपक्रमाच्या मागाठाणे आगारातील कर्मचारी वर्गाने काम बंदच केले. मात्र, बेस्ट उपक्रमातील कोणत्याही संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला नाही. तसेच बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि दि बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी बोनस विषयाबाबत एकमेकांवर आरोप केले.

आणखी वाचा-Poonam Mahajan : “आजही आठवतं, वडिलांचं रक्त माझ्या हातांना लागलं होतं…”, पूनम महाजन प्रमोद महाजनांच्या आठवणींत भावूक

परिणामी, कामगार संघटनेचे किंवा बेस्ट प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी रविवारीच एक दिवसाचे काम बंद केले. याबाबत लोकसत्ताने वृत्त प्रकाशित केल्यानंतर, सोमवारी कुलाबा येथील बेस्ट भवनात मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी बेस्ट कामगार संघटनांची बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेकडून बेस्ट उपक्रमाला ८० कोटी रुपयांची बोनसाची रक्कम देण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन, पुढील दोन दिवसांत बोनस देण्यात येईल, असा निर्णय झाला.

निवडणूक आयुक्तांच्या परवानगीची प्रतीक्षा

सोमवारी मुंबई महानगरपालिकेकडून बोनसची रक्कम मिळाली आहे. सध्या निवडणूक आचारसंहितेमुळे बोनसचे वाटप करण्याविषयी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे शहानिशा करून किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांची अनुमती घेऊन ही रक्कम बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali bonus for best employees 80 crores credited in administration account mumbai print news mrj