दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी तरुणाईसह आबालवृद्ध ठेवणीतले कपडे घालून रस्त्यांवर उतरले, एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छांची देवाणघेवाण केली. विशेष म्हणजे यंदा दिवाळीच्या सकाळी घरी फराळ आटोपून अनेकांनी दुपारचे जेवण मित्रमैत्रिणींसह हॉटेलमध्ये घेणेच पसंत केले. सकाळच्या वेळी उधाणलेला हा उत्साह दुपारी थोडासा कमी झाला. मात्र मावळत्या सूर्यप्रकाशाने वाऱ्याला साथीला घेतल्यावर पुन्हा रस्ते गजबजले.
नरकचतुर्दशीच्या पहाटे लवकर उठून रांगोळी काढलेल्या पाटाभोवती बसणे, तेलाने अंग रगडून त्यावर सुगंधी उटणे लावणे आणि मग आंघोळ करणे, या गोष्टी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई आणि परिसरातील जवळपास प्रत्येक घरात अगदी न चुकता घडल्या.
पहाटेच्या गुलाबी थंडीची जागा उकाडय़ाने घेतली असली, तरी पारंपरिक पद्धतीने साग्रसंगीत अभ्यंगस्नान पार पडले. त्यानंतर आबालवृद्धांची पावले शहरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांकडे वळली. काहींनी जवळच्या नाटय़गृहांमध्ये जाऊन ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा नरकचतुर्दशीच्या दिवशी वाजणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण कमी होते.
अनेकविध रंगांच्या पोशाखांमध्ये तरुण-तरुणींनी आपापल्या नाक्यांवर हजेरी लावली होती. ग्रुप फोटो ते सेल्फीपर्यंत यथेच्छ छायाचित्रण झाल्यावर अनेकांनी फराळावरही ताव मारला. संध्याकाळीही बाजारपेठा फुलल्या होत्या. आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती.

Story img Loader