मराठी साहित्य-सांस्कृतिक विश्वात महत्वाचे स्थान असणाऱ्या आणि आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळणाऱ्या दिवाळी अंकांची परंपरा १०५ वर्षांची आहे. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी ‘मासिक मनोरंजन’चा दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित केला. मराठीतील हा पहिला दिवाळी अंक मानण्यात येतो. कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ, रुपयाच्या तुलनेत डॉलरचा वाढलेला भाव आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम यंदाच्या वर्षी दिवाळी अंकांच्या किंमतीवरही झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी अंकांच्या किंमती १८० ते २५० रुपयांच्या घरात गेल्या आहेत.
मराठीत दरवर्षी तीनशे ते साडेतीनशे अंक प्रकाशित होत असतात. गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपये अशी होती. यंदाच्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या आहेत. मात्र असे असले तरीही दरवर्षीप्रमाणे दिवाळी अंकांना मागणी कायम आहे.
वैयक्तिक स्तराबरोबरच सार्वजनिक आणि खासगी वाचनालये, विविध शासकीय/निमशासकीय कार्यालये, सहकारी गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी काही लोकांनी एकत्र येऊन चालविले जाणारे दिवाळी अंकांचे वाचनालय यांच्याकडून दिवाळी अंकांना मागणी असल्याचे प्रसिद्ध वितरक ‘बी. डी. बागवे आणि कंपनी’चे हेमंत बागवे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.   यंदाच्या वर्षी ‘हंस’ आणि ‘मोहिनी’ या दिवाळी अंकांची किंमत २५० रुपये इतकी आहे. अन्य दिवाळी अंकांच्या तुलनेत या अंकांची किंमत सगळ्यात जास्त असली तरी या अंकांचे वैशिष्टय़ म्हणजे या अंकांमध्ये एकही जाहिरात नाही. जाहिरातीशिवाय अंक काढण्यात आला असल्याचे सांगून बागवे म्हणाले की, प्रत्येकानेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी किंमतींमध्ये ३० ते ५० रुपयांची वाढ केली आहे.
सर्वसाधारणपणे ज्योतिष, धार्मिक-आध्यात्मिक, आरोग्य, पाककृती आदी विशिष्ट विषयांना वाहिलेल्या अंकांना अन्य विषयांच्या तुलनेत जास्त मागणी असते. ललित लेखन/साहित्यविषयक अंकांच्या तुलनेत हे अंक वैयक्तिकस्तरावर जास्त प्रमाणात घेतले जातात.