लक्षाधीश, करोडपती व्हावे, असे स्वप्न उराशी घेऊन प्रत्येक जण जगत असतो. या आशेचे हजारो दीप उजळीत येणाऱ्या दीपावलीत यंदा आपले नशीब अजमावणाऱ्यांना लॉटरी बक्षीसांचा बंपर धमाका असून तब्बल २५४ सोडती पुढील पाच-सहा दिवसांत काढल्या जाणार आहेत. अब्जावधी रूपयांची उलाढाल यात होणार असून ऑनलाईन लॉटऱ्यांना सर्वाधिक पसंती आहे, तर बेकायदा लॉटऱ्याही तेजीत आहेत.
राज्यात महाराष्ट्र राज्य लॉटरीसह सिक्कीम, मिझोराम, गोवा या राज्यांच्या पारंपारिक व ऑनलाईन लॉटरी मोठय़ा प्रमाणावर विकल्या जातात. महाराष्ट्र राज्य लॉटरीपेक्षा त्यांचा धंदा अनेकपटीने अधिक आहे. या लॉटरी आयोजकांनी दिवाळीनिमित्त १२ ते १८ नोव्हेंबपर्यंत सोडतींचा धमाका आयोजित केला असून दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत २० मिनीटांच्या अंतराने सोडती जाहीर केल्या जाणार आहेत. गोव्यातील प्रसिध्द बँड्र ‘राजश्री’ च्या सर्वाधिक म्हणजे तब्बल १६१ सोडती असून त्या खालोखाल सिक्कीमच्या ‘प्लेविन’ लॉटरीच्या ५३ सोडती आहेत. मिझोरामच्या शुभलक्ष्मी लॉटरीच्या १४ तर सिक्कीमच्या जनलक्ष्मी लॉटरीच्या ७ सोडती आहेत. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या पारंपारिक ११ सोडती काढल्या जाणार आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा सोडतींचे प्रमाण वाढले आहे. दिवाळीनिमित्ताने बोनस आणि उचल हातात पडल्याने नोकरदारांच्या हातात पैसे खुळखुळत आहेत. त्यामुळे आपले मनसुबे साकारण्यासाठी लाखो-करोडो रूपयांच्या आमिषाला भुलून शेकडो जण ऑनलाईन लॉटरी सेंटरपुढे गर्दी करीत आहेत. तेथे पाय ठेवायलाही जागा नसून पुढील दोन-तीन दिवसांत मोठा धंदा होण्याची आशा विक्रेत्यांना आहे. मंदीचा फटका या व्यवसायाला नसून उलट निराश झाल्याने दैवावर हवाला ठेवून नशीब अजमावण्यासाठी बरेच जण लॉटरीचा आसरा घेतात. त्यामुळे लॉटरीचा धंदा वाढतच आहे. या काळात बेकायदा ऑनलाईन लॉटरी चालविणाऱ्यांचा धंदाही वाढत असून शासन यंत्रणेचे त्यावर फारसे नियंत्रण नसते. बेकायदा लॉटरी विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा अर्थविभागाने दिला आहे.
दिवाळीत २५४ लॉटरी सोडतींचा धमाका
लक्षाधीश, करोडपती व्हावे, असे स्वप्न उराशी घेऊन प्रत्येक जण जगत असतो. या आशेचे हजारो दीप उजळीत येणाऱ्या दीपावलीत यंदा आपले नशीब अजमावणाऱ्यांना लॉटरी बक्षीसांचा बंपर धमाका असून तब्बल २५४ सोडती पुढील पाच-सहा दिवसांत काढल्या जाणार आहेत.
First published on: 12-11-2012 at 02:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali lottery