दिवाळी आली की बाजारात वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊन काळय़ा बाजारात अवाच्या सव्वा दराने वस्तू मिळण्याचा काळ आता इतिहासजमा झाला असला तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर बाजारात मुबलक दिसत असलेल्या वस्तूंचा भाव वधारण्याची परंपरा सुरू झाली आहे. खव्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्याने चांगलीच मागणी असलेल्या चारोळी, काजू, मनुका यासारख्या सुक्यामेव्याचे दर एक महिन्यात १५ ते ८० टक्क्यांनी वाढल्याचे चित्र आहे. तर फराळासाठी आवश्यक असलेल्या खोबऱ्याचा दर एका महिन्यात २२० रुपयांवरून थेट ३०० रुपयांवर गेला आहे.
दिवाळी आली की रवा, मैदा, पोहे, साखर, पिठीसाखर, तेल, तूप या किराणा मालाची मागणी वाढते. या वर्षी तूप वगळता या वस्तूंच्या किमतीत फार वाढ झालेली नाही. तुपाचे दर मात्र किलोमागे ५० रुपयांनी वाढले असून ते ३५० रुपयांवरून ४०० रुपये प्रति किलो झाले आहेत. फराळातील आणखी एक महत्त्वाचा जिन्नस म्हणजे सुके खोबरे. करंज्या, रव्याचे लाडू यांसारख्या गोड पदार्थासाठी खोबरे किसण्याच्या त्रासापासून महिलांची सुटका करण्यासाठी खोबऱ्याचा कीस मोठय़ा प्रमाणात घेतला जातो. तर चिवडय़ात काप टाकण्यासाठी खोबऱ्याची वाटी घेतली जाते. गेल्या वर्षीच्या दिवाळीत १७०-१८० रुपये प्रति किलोने मिळणारा हा खोबऱ्याचा कीस या वेळी तब्बल ३०० रुपये किलो दराने मिळत आहे. आश्चर्य म्हणजे अगदी मागच्या महिन्यात हा दर २२० रुपये प्रति किलो होता. मुंबईतील बहुतांश नारळाचे पदार्थ हे केरळमधून येतात. केरळमध्ये नारळ उतरवून देणाऱ्या माणसांची कमतरता भासू लागली आहे. त्यातच सणांमध्ये नारळांची मागणी वाढल्यावर ही समस्या अधिक उग्र होते. या वेळी नवरात्रापासूनच नारळांचे भाव वाढू लागले, असे एका विक्रेत्याने म्हटले.
सुकामेवा महाग
मिठाईतील माव्यामध्ये होत असलेली भेसळ तसेच आहाराबाबत दक्षता वाढल्याने गेल्या काही वर्षांत दिवाळीत सुक्यामेव्याची मागणी चांगलीच वाढत आहे. अक्रोड व दिवाळीच्या फराळात वापरल्या जाणाऱ्या चारोळी व मनुकांच्या किमतीत घसघशीत वाढ झाली आहे.