चिंतन आदेश
चिंतन आदेशचा दरवर्षीचा दिवाळी अंक हा एका आगळ्या वेगळ्या विषयाला वाहिलेला अंक असतो. यंदा प्रत्येकाच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी हा विषय घेऊन अनेक मान्यवरांना चिंतन आदेशने लिहिते केले आहे. ही कलाटणी कोणत्याही प्रकारची असू शकते. कधी त्यात फजिती होते तर कधी त्यात संपूर्ण आयुष्य बदलून संबंधित व्यक्ती वेगळ्या वाटेवर आपले आयुष्य जगत असते. अरविंद व्यं. गोखले, नंदिनी भुवड, सुनंदा मुळे, अनघा ठोंबरे, सुनीता लवटे, कॅप्टन पुरुष बावकर यांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी त्यांना एका वेगळ्या वाटेवर घेऊन गेलीच पण त्यातही मिळालेला वेगळा अनुभव वाचकांना मिळतो.
संपादक : अभिनंदन थोरात,
पाने : ३६४; किंमत : १२० रुपये
प्रतिभा भाग १ व २
महाराष्ट्रीय सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक ठरलेल्या दिवाळी अंक परंपरेचे नेटके संकलन हे यंदाच्या व्यास क्रिएशन्सने प्रकाशीत केलेल्या प्रतिभा दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ आहे. १९०९ मध्ये काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी त्यांच्या मनोरंजन मासिकाचा दिवाळी अंक प्रसिद्ध केला. तेव्हापासून अगदी गेल्या वर्षीपर्यंतच्या विविध दिवाळी अंकांमधील निवडक वाङ्मयीन रचनांचा समावेश दोन भागात प्रसिद्ध करण्यात आलेल्या या ‘प्रतिभा’ दिवाळी अंकात आहे. पहिल्या भागात कमलाबाई टिळक, दत्तू बांदेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, गं.बा.सरदार, नरहर कुरुंदकर, पु.भा.भावे, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, विद्याधर पुंडलिक, वि.स. खांडेकर, मारुती चित्तमपल्ली, पु.ल.देशपांडे, अ.का. प्रियोळकर, बालकवी, विंदा करंदीकर, ग.दि. माडगुळकर, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर आदी दिग्गजांच्या लेखांचा आणि कवितांचा समावेश आहे. दुसऱ्या भागात रत्नाकर मतकरी, मंगला गोडबोले, भाऊ पाध्ये, अरुण साधू, बाबुराव अर्नाळकर, दुर्गाबाई भागवत, आनंद यादव, आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर,
बा.भ. बोरकर, आरती प्रभू, शंकर वैद्य आदी मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचे अत्यंत गाजलेले लेख-कविता संकलित करण्यात आले आहेत. पहिल्या भागाचे मुखपृष्ठ चित्रकार सुहास बहुळकर तर दुसऱ्या भागाचे मुखपृष्ठ रवि मुकुल यांनी रेखाटले आहे. बदलापूर येथील ग्रंथमित्र श्याम जोशी यांच्या संग्रहात दिवाळी अंक परंपरेचा हा शतकोत्तर ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे. दिवाळी अंक परंपरेचा धावता इतिहासच या दोन अंकाद्वारे वाचकांना उपलब्ध झाला असून हा ठेवा संग्राह्य़ आहे.
– प्रतिभा भाग १ आणि २
किंमत -६०० रुपये (एकत्रित)
चारचौघी
यंदाचा ‘चारचौघी’चा दिवाळी अंक वाचनीय आहे. ‘सासू संपली आजी आली’ या भा. ल. महाबळ यांच्या कथेत आजी झालेल्या वृद्ध महिलेचे आपुलकीचे नाते उलगडून दाखविण्यात आले आहे. गुरुनाथ तेंडूलकर यांची भरारी, शुभा नाईक यांची सत्कार, स्मिता वाईकर यांची समतोल या कथाही वाचनीय आहे.
बॉलीवूड चित्रपटसृष्टीवर जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते.
अनुप्रिता परांजपे यांच्या ‘जन्मशताब्दी बॉलीवूडची’ या लेखात आपल्या चित्रपत्रसृष्टीची सविस्तर माहिती आहे. त्याशिवाय परिसंवाद या दालनामध्ये कुटुंब व नातेसंबंध यावर विवेचन करण्यात आलेले आहे. प्रत्येक व्यक्तीची कधी ना कधी फजिती होत असते. सिलिब्रेटींच्या फजितीबाबत वाचायला प्रत्येकालाच आवडते. ‘माझी फजिती’ या दालनात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्या फजितीबाबत माहिती दिली आहे.
चारचौघी
संपादिका : रोहिणी हट्टंगडी
किंमत : १२५, पृष्ठे : २४२