डीजे बंदीवर काहीतरी तोडगा काढावा या मागणीसाठी सोमवारी डीजे ऑपरेटर्सनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबई, ठाणे आणि नाशिक भागातून मोठया संख्येने डीजे ऑपरेटर्स राज यांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बी साउंड सिस्टिम वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टिममुळे मोठया प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होते. सण येत जात राहतील पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही  असे सांगत उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातली आहे. या बंदी आदेशातून काहीतरी तोडगा निघावा यासाठी डीजे ऑपरेसटर्सनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.

दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठया प्रमाणावर डीजे साउंड सिस्टिमचा वापर केला जातो. डीजे साउंड सिस्टिमच्या वापराबद्दल काही मंडळे ठाम असून यावरुन काही भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. १९ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादित डेसिबलपर्यंतचा आवाज ठेवला तरी पोलीस कारवाई का करत आहेत असा सवाल प्रोफेशनल ऑडिओ अँड लायटिंग असोसिएशनने केला होता.  आमच्या व्यवसायावर गदा आणली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.