शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारण्यात येणाऱ्या ६०० खाटांच्या करोना आरोग्य केंद्रासाठी ५० तज्ज्ञ डॉक्टर आणि १०० परिचारिकांचे मनुष्यबळ पुरवण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण(डीएमईआर) विभागाने केरळ आरोग्य विभागाला केली आहे.
राज्यात करोना रुग्णांची संख्या दरदिवशी किमान अडीच हजाराने वाढत असून मुंबई आणि पुण्यात येत्या काळात यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत शहरातील सध्या २१ हजार ४८७ रुग्ण असून दरदिवशी किमान दीड हजार रुग्णांचे निदान नव्याने होत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयातील भरलेल्या खाटा यामुळे आता मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आता महालक्ष्मी येथील रेसकोर्स येथे ६०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. येथे १२५ खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू करण्यात येईल.
राज्यातील सावर्जनिकसह खासगी रुग्णालयातील मनुष्यबळ कार्यरत असून अपुरे पडत आहे. तेव्हा या दोन्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टर आणि परिचारिकांची आवश्यकता असल्याचे नमूद करत डीएईआरने ५० पदव्युत्तर डॉक्टर आणि १०० परिचारिका तात्पुरत्या काळासाठी देण्याची मागणी पत्राद्वारे केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांच्याकडे शनिवारी केली आहे.
एमबीबीएस डॉक्टरांना ८० हजार रुपये, तज्ज्ञ डॉक्टरांना १ लाख रुपये आणि परिचारिकांना ३० हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्यात येईल. त्याच्या राहण्यासह जेवणाची सोय आणि वैयक्तिक सुरक्षा साधने देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे ही या पत्रात नमूद केले आहे.