लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली, जळगाव व अहमदाबाद येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले. या कारवाईत डी-मॅट खाते, बँक खाते अशा एकूण साडेसात कोटी रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. या कारवाईत संशयित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती ईडीकडून सोमवारी देण्यात आली.

यातील आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या (डीएमसीएसएल) माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविल्या. त्यानंतर, कुटे यांच्या विरोधात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरूपात १६८ कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आली असून त्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने याप्रकरणात २० व २१ ऑगस्टला दिल्ली, जळगाव व अहमदाबाद अशा विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे ईडीकडून सोमवारी सांगण्यात आले.

आणखी वाचा-Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; सीबीआयने तपास हाती घेताच दाखल केला एफआयआर

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. त्याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबाराव कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि अन्य संबंधित करत होते. विविध ठेव योजना आणून त्यांनी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा केला. वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि एफडीआर कर्ज अशा विविध योजना सुरू केल्या. त्यात आतापर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार फसवणुकीची अंदाजित रक्कम १६८ कोटी रुपये आहे. सुरेश कुटे यांनी दिब्यायन दास शर्मा यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्यात दहा हजार कोटींचा निधी उभा करण्याचा खोटा दावा केला होता, असे ईडीच्या तपासात उघडकीस आले आहे.

आणखी वाचा-विद्यापीठ अधिसभा निवडणूक आजच; प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचाही नकार

सुरेश कुटे आणि इतरांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना डीएमसीएसएलकडे पैसे जमा करण्याचे आमिष दाखविल्याचे ईडीच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणात, ईडीने यापूर्वी ९ ऑगस्टला शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी पावणे दोन कोटींच्या ठेवी गोठवण्यात आल्या होत्या. तसेच विविध अन्य पुरावे आणि डिजिटल साधने जप्त केली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ कोटी २० कोटी आहे. पुढील तपास सुरू आहे.