लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : आरोपी पोलीस कोठडीत असताना त्याचा आत्मसन्मान व गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि आरोपींना विवस्त्र न ठेवण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सगळ्या पोलीस ठाण्यांना दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी हे आदेश काढले आहेत.

पोलीस महासंचालकांचे याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारतर्फे बुधवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने त्याची दखल घेतली. कोठडीत आरोपीचे कपडे काढणे अयोग्य आहे, असे नमूद करून अशा प्रकारांना रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार हे स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस महासंचालकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर उपरोक्त परिपत्रक काढण्यात आले आहे.

आणखी वाचा-मलबार हिलमध्ये वृद्धेची नोकराकडून हत्या, आरोपीला भुसावळमधून अटक

ताडदेवस्थित नितीन संपत यांच्या पत्नीने केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी पोलीस कोठडीत आरोपींचा आत्मसन्मान जपण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. विनयभंगाच्या आरोपाखाली संपत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना सातरस्ता येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी, त्यांचे कपडे काढले, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. तसेच, पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि संपत यांना बेकायदा ताब्यात घेतल्याप्रकरणी नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not let the self esteem of the accused be violated in police custody director general of police orders mumbai print news mrj