रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांची अवस्था सध्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विचारणार नाही आणि सेना-भाजपतही काही किंमत नाही अशी ‘घर का ना घाट का’ अवस्था असलेल्या आठवले यांनी मनसे विसर्जनाच्या वल्गना करू नये असा इशारा मनसेने दिला आहे.
शिवससेनेत मनसे विसर्जित केल्यास राज ठाकरे यांचे महायुतीमध्ये स्वागत करू, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. त्याचा समाचार घेताना मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर म्हणाले की, मुळात आठवले यांच्यामागे आज त्यांचा समाजही नाही. महापालिका निवडणुकीत त्यांची ताकद दिसून आल्यामुळेच सेनेने राज्यसभेवर त्यांना पाठवले नाही. त्यावेळी त्यांनीच केलेला थयथयाट त्यांनी आठवून पहावा. मुळात मनसेची भूमिका एकला चलो रे, अशीच राहिली आहे. आम्ही कोणाकडेही टाळी मागण्यासाठी गेलेलो नाही. उलट भाजपनेच वेळोवेळी आम्हाला डोळे मारण्याचे उद्योग केले. मनसेमुळे युतीला किती जागंवर फटका बसला याची आकडेमोड भाजपचे नेतेच करत आहेत. आता तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मनसेक डे टाळीसाठी हात पुढे केला आहे असे सांगून नांदगावकर म्हणाले, आठवले यांना आता सेना-भाजपमध्येही काही किंमत राहिलेली नसल्यामुळेच उद्धव यांना खूश करण्यासाठी कहीतरी बरळण्याचे काम ते करत आहेत. यापूर्वीही त्यांनी मनसेला महायुतीत घेण्यास अनेकदा जाहीर विरोध केला. मुळात राज ठाकरे यांनी पहिल्यापासून एकला चलो रे भूमिका घेतली असताना  शिवसेनेत मनसे विसर्जन केल्यानंतर राज यांचे स्वागत करण्याची भूमिका मांडणाऱ्या आठवले यांच्यावर शिवसेनेने स्वागताध्यक्षाची जबाबदारी दिली आहे का तेही त्यांनी स्पष्ट केले असते तर बरे झाले असते, असा टोलाही बाळा नांदगावकर यांनी लगावला.

Story img Loader