पालकमंत्री, खासदार, आमदार अशा बडय़ा राजकीय नेत्यांच्या गर्दीत मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेले ठाणे रेल्वे स्थानकातील सरकते जिने उद्घाटनानंतर तासाभरातच बंद पडल्याने रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. तीन आणि चार क्रमांकाच्या फलाटावर बसविण्यात आलेले अतिशय अरुंद असे सरकते जिने ठाणे स्थानकातील गर्दीवर उतारा ठरतील काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
फलाटांवर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला पादचारी पुलाकडे वेगाने वाट काढता यावी, यासाठी मध्य रेल्वेने सरकत्या जिन्यांचा पहिला प्रकल्प ठाणे स्थानकात सुरू केला आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी दुपारी ठाण्यातील बडय़ा नेत्यांच्या उपस्थितीत या जिन्यांना हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर मॉल स्टाइलने उभारण्यात आलेल्या सरकत्या जिन्यांवरून पादचारी पूल गाठण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी याठिकाणी होऊ लागली. प्रवाशांचा ओघ वाढताच काही वेळातच जिने बंद पडले. सरकत्या जिन्यांवरून काही प्रवाशांनी रेतीच्या गोणी वाहून नेल्या. त्यामुळे रेती अडकून एस्कलेटरची यंत्रणा बंद पडल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर हे जिने पूर्ववत करण्यात आले. तरी अधूनमधून ते बंद करावे लागत होते.

Story img Loader