मुंबई : महानगरपालिकेने मुंबईमधील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून धोकादायक फांद्याची छाटणी केली आहे. असे असले तरी, मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, तसेच झाडांखाली वाहनेही उभी करू नयेत, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, उद्यान विभागाने योग्य खबरदारी घेवून कार्यवाही केली आहे. पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मुंबई महानगरातील धोकादायक झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे.
सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना झाड पडण्याची अथवा फांदी तुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसापासून बचाव करताना नागरिकांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे. याबाबत उद्यान विभागाने मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी माहितीपत्रके लावून जनजागृती केली आहे.
हेही वाचा – मुंबई : सातही धरणांमध्ये ५.६४ टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा
इमारती तसेच गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती धोकादायक वाटणाऱ्या झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयातील उद्यान विभागाशी किंवा १९१६ या नागरी सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. तसेच मुंबईकरांनी आपल्या इमारती, सोसायटी आवारातील धोकादायक झाडांची रितसर परवानगी घेऊन छाटणी करून संभाव्य धोका टाळावा, असेही ते म्हणाले.