करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिर व धार्मिकस्थळ स्थळ उघडली जावीत, अशी मागणी करत भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सोमवारी याच मागणीसाठी राज्यभरात भाजपाकडून शंखनाद आंदोलन देखील करण्यात आलं. राज्य सरकारने मद्यालयं सुरू करण्यास परवानगी दिली मात्र देवालयांना अद्यापही टाळेच आहे, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. तर, सर्वसामान्यांसाठी नियमानुसार बंद असलेल्या मंदिरात मात्र व्हीआयपी व्यक्ती जाऊन दर्शन घेत असल्याचं समोर आलं आहे. ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील असा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आणल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेताना दिसत आहेत. यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“शिवसेना खासदार राहुल शेवाळ यांनी सिद्धिविनायकाचे मागील दाराने दर्शन घेतले. मग सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका आणि मंदिरे कडीकुलुपात ठेवून जनतेचाही अंत पाहू नका.” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे – मुख्यमंत्री

तर, करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला आहे. पोलिसांनी नेत्यांसह मंडळांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिल्यानंतरही मुंबईसह ठाण्यात विविध ठिकाणी हंड्या फोडण्यात आल्या. शिवाय, ठाकरे सरकार हे हिंदू विरोधी सरकार असल्याचं देखील भाजपा नेत्यांकडून म्हटल्या गेलं आहे, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Exclusive: सामान्यांसाठी सिद्धिविनायक मंदिर बंद पण शिवसेना खासदारासहित VIP व्यक्तींना मागच्या दाराने प्रवेश

“हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, दहीहंडी आणि गणेशोस्तव या काळामध्ये दक्षता पाळा. सरकार कोणत्या सणाविरुद्ध नाही तर आपण करोनाविरुद्ध आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी करोनाविरुद्ध आंदोलन करा,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावरूनही भाजपा नेते अतुल भातखळकरांनी निशाणा साधला आहे.

“ ‘आम्ही हिंदूंच्या सणांविरुद्ध नाही’, असा खुलासा मुख्यमंत्र्याना करावा लागला, यातच सर्व आलं. जनता पाहतेय की ठाकरे सरकारने आधी दारूची दुकाने उघडली, मंदिरे अजून बंद आहेत. राज्यातले सत्ताधारी मात्र चोरून मंदिरात दर्शन घेतात. मोहरमला सशर्त परवानगी मिळते आणि दहीहंडीवर सरसकट बंदी येते.” असं भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

भाजपाचा राज्यभरात शंखनाद!

तर, राज्य सरकारला केवळ नोटांचा व मद्य दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी शंखनाद करण्यात आल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. करोना निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले. मात्र मंदिरे सुरू झाली नाहीत. त्यामुळे भाजपला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागल्याचे सांगत पाटील यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not try to rule over god and bhatkhalkars target thackeray government msr