‘जंगलाच्या कथा आणि व्यथा’मधील तज्ज्ञांचा सूर

पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करण्याबरोबरच त्याच्या व्यवस्थापनाकडे नीट लक्ष दिले तर निसर्ग, व्यक्ती, पशूपक्षी अशा विविध घटकांचा विकास शक्य आहे. त्यासाठी पर्यावरणकेंद्री संस्कृती रूजविणे आवश्यक असून ते सरकारच्या पुढाकारनेच शक्य होईल. परंतु, आपल्याकडे जंगलांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या कायद्यांचा सोयीने अर्थ लावून त्याचे विकास व शेतीच्या नावाखाली अतिक्रमण केले जात आहे. किमान महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात वनक्षेत्राचा वापर मतांसाठी व्हायला नको, असा सूर ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाअंतर्गत आयोजिण्यात आलेल्या ‘जंगलाच्या कथा आणि व्यथा’ या पहिल्या सत्रात उमटला.

अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्यासह खारफुटी आणि शहरी जंगलाचे अभ्यासक विवेक कुळकर्णी आणि वन संवर्धनाचे काम करणाऱ्या ‘सातपुडा फाऊंडेशन’चे संस्थापक किशोर रिठे हे या सत्रात सहभागी झाले होते. सत्राची सुरूवात कुळकर्णी यांनी मुंबईतील वन्यसृष्टीत अंतर्भाव असलेल्या तिवरांच्या जंगले आणि ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’अंतर्गत पसरलेल्या जंगल परिसराच्या व्यथांचा आढावा घेऊन केली.

तिवरांच्या जंगलांबाबत असलेल्या वेगवेगळ्या गैरसमजांचा आढावा घेऊन त्यांनी पर्यावरणाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे ठाण्याच्या खाडीची कसी वाट लागली आहे ते नेमकेपणाने सांगितले. तिवरांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीय झाल्याने समुद्रातील इतर जीवसृष्टीचा अभ्यास आणि संवर्धनाकडे आपले दुर्लक्ष झाले, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. अर्थात मुंबईला लागून असलेली तिवरांची जंगले ही या शहराच्या जैवविविधतेत भर टाकण्याचे काम करतात. त्यामुळे आवश्यक तिथे त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

किशोर रिठे यांनी वन्यजीवांच्या शिकारींना आळा घालण्यात अपयश आल्याने वाघांचे जंगल कसे संपायला लागले आहे ते नेमकेपणाने सांगितले. वाघांची किंवा सिंहांची शिकार करणाऱ्या आदिवासी जमातींना योग्य तो उपजिवीकेचा मार्ग उपलब्ध करून दिला तर या शिकारी कमी होती, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या शिकारींना आळा घालण्यासाठी गुजरात सरकारने केलेल्या उपाययोजनांचा आवर्जून उल्लेख केला. यावर जंगलांमधील चोरटी वृक्षतोड, वन्य जीवांची हत्या यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यासाठी पावले टाकण्यात येत आहेत. त्यासाठी उपग्रहाद्वारे टेहळणी यंत्रणा व अन्य बाबींची उभारणी करण्यात येत असल्याचे मुनगुंटीवार यांनी सांगितले.

वनसंपदा गरजा पूर्ण करु शकते, हव्यास नाही

वनसंपदेने मानवी जीवनाला आवश्यक घटक पुरविले जाऊ शकतात. त्यातून आपल्या गरजा भागू शकतात. मात्र हव्यास बाळगून ही संपदा नष्ट केली, तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तिसरे महायुध्द जर पाण्यामुळे होणार असेल, तर मानवी हव्यासामुळे चौथे कदाचित प्राणवायूसाठी होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. –सुधीर मुनगंटीवार