करोनाचा प्रादुर्भाव जगभरातल्या बहुतांश देशांमध्ये वाढतो आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया या देशांनी करोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत ते चांगले आहेत असं WHO ने म्हटलंय. अशातच जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने करोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतल्या धारावी मॉडेलचंही कौतुक केलं आहे.
धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी धारावी मॉडेलही महत्त्वाचं आहे असं WHO चे प्रमुख टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटलं आहे.
काय आहे धारावीचा पॅटर्न?
करोनाच्या चाचण्या करणे
रुग्णांचा शोध घेणे
रुग्णांचा शोध घेऊन त्यांचं अलगीकरण
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न
सोशल डिस्टन्सिंग पाळणे
या महत्त्वाच्या सूत्रांचा वापर करुन धारावीने एक मॉडेल तयार केलं. ज्यामुळे करोनाची संख्या दाट लोकवस्ती असूनही कमी करण्यास मदत झाली. धारावीच्या या पॅटर्नचं WHO ने कौतुक केलं आहे.
धारावीचा कोरोनामुक्तीकडचा प्रवास..
धारावीचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता… स्थानिक धारावीकर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पहावे लागेल. करोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करून रुग्णांवर योग्य उपचार करणे, शारीरिक अंतराच्या नियमाचे, स्वच्छतेचे आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते…. हेच धारावीमध्ये दिसून आले आहे. धारावीच्या मॉडेलचं मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केलं आहे.