मुंबई : नियोजित वेळेपूर्वीच प्रसूती झालेल्या आई आणि बाळाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयामधील नवजात अतिदक्षता विभागातील (एनआयसीयू) डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या बालरोग आणि स्त्री रोग विभागातील डॉक्टरांनी बुधवारी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला. रुग्णालय प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर महिला आणि बालकांचे हाल झाले. उपनगरीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरला मारहाण व शिवीगाळ करण्याची ही आठ दिवसांतील दुसरी घटना आहे.
सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला अचानक त्रास सुरू झाल्याने डॉक्टरांनी ७ नोव्हेंबर रोजी तिची तातडीने प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निकीता आणि डॉ. नंदन यांनी प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी डॉ. मेहिका तेथे उपस्थित होत्या. सदर महिलेचे सिझेरिंग करण्यात आले. मात्र प्रसूतीनंतर आई व बाळाची प्रकृती बिघडली. त्यामुळे बाळाच्या आईला तातडीने नायर रुग्णालयात हलविण्यात आले. जन्माला आल्यापासून बाळाच्या हृदयाचे ठोके कमी पडत होते. तसेच बाळ जन्माला आल्यापासून रडलेही नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला तातडीने एनआयसीयूमध्ये दाखल केले. बाळाला जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. मात्र बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. बाळाच्या प्रकृतीबाबत त्याच्या नातेवाईकांना डॉक्टरांकडून वेळोवेळी तोंडी व लेखी माहिती देण्यात येत होती. मात्र उपचारादरम्यान १० नोव्हेंबर रोजी बाळाच्या आईचा नायर रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी बाळाचाही मृत्यू झाला.
हेही वाचा >>>परिचारिका चार महिने वेतनाविना
बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, तसेच त्यांना मारहाणही केली. तसेच त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालून त्यांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ केली. याप्रकरणी डॉ. मेहिका यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी बालरोग व प्रसूतीरुग्ण विभागातील डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला. त्यामुळे या विभागात येणाऱ्या ५० हून जास्त रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला. गेल्या आठ दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयामध्ये डॉक्टरला मारहाण व शिवीगाळ करण्याची ही दुसरी घटना आहे. घाटकाेपरमधील राजावाडी रुग्णालयात ८ नोव्हेंबर रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ केली होती.
रुग्णांची अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी
व्ही.एन.देसाई रुग्णालयाच्या बालरोग व स्त्री रोग विभागातील डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवल्याने उपचारासाठी आलेल्या महिला व लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याच्या मागणीसाठी थेट वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.