दिवा भागातील विल्यम जेकब या डॉक्टरने रूग्णालयात उपचार घेत असलेल्या युवतीला सलाईनमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बदनामीच्या भीतीपोटी या युवतीने आठ दिवस पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, या प्रकरणी तिने गुरूवारी तक्रार देताच मुंब्रा पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
डॉ. विल्यम जेकब, हा सहा महिन्यांपासून दिवा भागातील स्वस्तिक रूग्णालयात काम करीत होता. तसेच या रूग्णालयामध्येच वास्तव्य करीत होता. दिवा भागात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवतीला मलेरिया झाला होता. त्यामुळे ती या रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.  २७ एप्रिलला डॉ.  जेकबने सलाईनमधून तिला गुंगीचे औषध दिले व तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने सलाईनमधील गुंगीचे औषध कचऱ्याच्या डब्यात टाकून पुरावा नष्ट केला. या घटनेबाबत युवतीने तिच्या कुटुंबियांना माहिती दिली. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी तिने पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेद्र नगरकर यांनी दिली.

Story img Loader