लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने जे.जे. रुग्णालयामधील परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. मात्र भारतीय परिचर्या परिषदेच्या मानांकनानुसार ही नियुक्ती योग्य नसून, यामुळे परिचर्या शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे परिचर्या संवर्गातील व्यक्तीचीच नियुक्ती करावी या मागणीसाठी जे.जे. रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संस्थेतील सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळपासून आंदोलनाला सुरूवात केली आहे. हे आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

जे.जे. रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने त्यांच्याकडील या पदाचा भार जे.जे. रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र हा पदभार सोपविताना भारतीय परिचर्या परिषदेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा दावा परिचर्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. भारतीय परिचर्या परिषदेच्या नियमांनुसार परिचर्या महाविद्यालातील प्राचार्यपदासाठी परिचारिका संवर्गातून एमएस्सी नर्सिंग किंवा डॉक्टरेट पदवी मिळवलेली व्यक्ती पात्र असते.

आणखी वाचा-मुंबई : कार्यालयात आढळलेल्या घोरपडीचा बचाव

तसेच त्या व्यक्तीला परिचारिका संवर्गामध्ये किमान १० वर्ष शिकविण्याचा अनुभव असणे अपेक्षित आहे. ही किमान अर्हता असलेली व्यक्तीच संस्थाप्रमुख होऊ शकते. मात्र जे.जे. रुग्णलयातील परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करताना या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. ही नियुक्ती तातडीने रद्द करून संबंधित पदावर परिचर्या संवर्गातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी जे.जे. रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संस्थेतील २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बुधवारपासून साखळी उपोषण पुकारले आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिली, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आणखी वाचा-व्यवस्थापन आराखडा अपूर्णच; मुंबई किनारपट्टीवरील खारफुटी, मिठागरे, मासेमारी केंद्र, जंगलांच्या माहितीचा अभाव

विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे परिचर्या शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय परिचर्या परिषदेकडे नोंदणी करताना ‘सी’ अर्ज भरावा लागतो. या अर्जावर संस्थाप्रमुखांची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र संस्थाप्रमुख हे परिचर्या संवर्गातील नसल्याने हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या नियुक्तीमुळे परिचर्या संवर्गातील एका महत्त्वाच्या पदावर डॉक्टर संवर्गातील व्यक्तीच्या नियुक्तीचा चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे भविष्यात परिचर्या संवर्गातील एका पदाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जे.जे. रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे निवेदन आले आहे. त्यावर विचारविनिमय करून योग्य निर्णय घेण्यात येईल. -राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor appointed as head of j j hospitals nursing college mumbai print news mrj