माहिम येथे दुचाकीने धडक दिल्याने  सय्यद हयात सरपोतदीन (१७) या तरुणाचा मृत्यू झाला तर दोन तरुण जखमी झाले. उपचारात दिरंगाई झाल्याने सय्यदचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी वांद्रे येथील भाभा रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण केली. यामुळे भाभा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले.
माहीमच्या परमानंद झोपडपट्टी परिसरात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात घडला. माहीमला राहणारे यश नागवेकर आणि दर्शन जुवेकर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावरून जाणाऱ्या सय्यदला धडक बसली. या अपघातात हे तिघे जखमी झाले. त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सय्यदचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत आप्तांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मोडतोड केली व डॉ. सिद्धार्थ शहा आणि डॉ. संदीप काळे व रक्षकालाही मारहाण केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी रुग्णालयात बंद पाळला गेला.  पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

.