मुंबई : कोलकाता येथील आर जी कर महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येच्या विरोधात ‘मार्ड’ने पुकारलेल्या आंदोलनाच्या विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या घटनेविरोधात शनिवारी डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला असून त्यामध्ये राज्यभरातील डॉक्टर सहभागी होणार आहेत.
महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांच्या संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आंतरवासिता विद्यार्थी, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि अध्यापक नसल्याने बाह्यरुग्ण सेवा पूर्णत: कोलमडण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपरमध्ये नियोजित शस्त्रकिया रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी उपाययोजना केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयामधील शिक्षकांची संघटना असलेली ‘म्युनिसिपल मेडिकल टीचर्स असोसिएशन’नेही (एमएमटीए) या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र अत्यावश्यक व अपघात विभागातील सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश राजाध्यक्ष यांनी सांगितले.
न्यायालयाचे ताशेरे
कोलकाता आर जी कर रुग्णालयात झालेली मोडतोड हे राज्य यंत्रणेचे सपशेल अपयश दर्शवते असे ताशेरे कलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी ओढले. तेथील परिस्थितीसंबंधी स्वतंत्रपणे प्रतिज्ञापत्र दाखल करावीत असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलीस आणि रुग्णालय अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, याप्रकरणी १९ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा…Mobile Clinics : गरिबांवरील उपचारासाठी तीन कोटींचे एक वाहन
रुग्णसेवा देणे हे मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी आपला दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपनगरीय रुग्णालयातून २०० डॉक्टरांची कुमक मागवण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णालयाला ५० डॉक्टर पुरवले जातील. त्यामुळे बाह्यरुग्ण सेवा बाधित होणार नाही. – डॉ. नीलम अंड्राडे, संचालक, महापालिका प्रमुख रुग्णालये
९० हजार डॉक्टर आंदोलनामध्ये सहभागी!
डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत ‘मार्ड’ने आंदोलन कायम ठेवले आहे. ‘मार्ड’च्या आंदोलनाला एमएबीआरडी, ‘अस्मि’, एमएमटीए या डॉक्टरांच्या संघटनांनी समर्थन दिले आहे. शनिवारच्या आंदोलनात राज्यातील जवळपास ९० हजारांपेक्षा जास्त डॉक्टर आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.