कॉरोनर कोर्ट बंद करण्यात आल्यानंतर गृहविभागाच्या अखत्यारितील जे.जे., कू पर, राजावाडी आणि भगवती रुग्णालयातील शवागारांमधील कामगारांची व डॉक्टरांची रिक्त पदे भरणे, आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे कामगार-डॉक्टरांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे तसेच या सर्व शवागारांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, दूरचित्रवाणी संच देण्याबरोबर सर्व अत्यावश्यक सुविधा देण्यात येतील, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
पूर्वी येथील कामगारांना अंडी व दूध देण्यात येत होते. ते कामगार व डॉक्टरांना देण्याबाबत आवश्यक ती तरतूद केली जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
शवागारांमध्ये मृतदेहांची होणारी हेळसांड आणि कामगारांच्या परवड ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन सर्व शवागारांना स्वत: भेट देऊन पाहणी करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. तसेच या सर्व शवागारात काम करणाऱ्या कर्मचारी व डॉक्टरांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे डॉ. सावंत यांनी सांगितले. ‘
लोकसत्ता’मधून याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबईचे पोलीस सर्जन डॉ. एस. एम. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयातील शवागारात ‘सर्व श्रमिक संघा’चे नेते मिलिंद रानडे व कामगारांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे असून त्यासाठी शासनाला आम्ही अहवाल सादर करणार असल्याचे डॉ. एस. एम. पाटील यांनी सांगितले. इंग्लंडमधील ‘रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट’ने शवविच्छेदन केंद्रांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर व कामगारांसाठी कोणत्या सुविधा असाव्यात यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्याचाही आढावा सुविधा देताना करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मृतदेहांची वेळेत विल्हेवाट लावणे व त्यांच्यावर योग्यरीतीने अंत्यसंस्कार करण्याचीही काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले. किमान माणूस म्हणून तरी आम्हाला वागवा ही शवागारांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची मागणी असून या कामगारांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता तसेच त्यांच्या अन्य समस्या त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेतल्या जाणार आहेत. राज्यातील ३३ जिल्हा रुग्णालये व आरोग्य विभागाच्या अखत्यारितील शवविच्छेदन केंद्राचाही आढावा घेऊन योग्य ती व्यवस्था तेथेही केली जाईल, असे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा