मुंबई : मेंदूतील रक्तवाहिनीवर निर्माण झालेल्या फुग्यामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या ५५ वर्षीय महिलेवर केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच शस्त्रक्रिया करून जीवदान दिले. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयामध्ये ५ ते ६ लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. मात्र, केईएम रुग्णालयामध्ये अवघ्या ४० हजार रुपयांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
उस्मानाबाद येथे वास्तव्यास असलेल्या आशा कठार (५५) यांना गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने डोकेदुखीचा त्रास होत हाेता. मागील काही दिवसांपासून हा त्रास अधिकच वाढल्याने त्यांच्या लहान बहिणीने त्यांना कल्याण येथील आपल्या घरी आणले. कल्याणमधील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी आशा यांना दाखविले असता तेथील डॉक्टरांनी त्यांच्या सीटी स्कॅनसह विविध चाचण्या केल्या. त्यांच्या मेंदूमधील रक्तवाहिनीत फुगा तयार झाल्याचे चाचणीच्या अहवालातून स्पष्ट झाले. हा फुगा फुटल्यास आशा यांचा मृत्यू होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे पाच ते सहा लाख रुपये खर्च येईल, असेही रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मात्र आशा व त्यांच्या बहिणीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी केईएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – “भाजपा बेडर आणि निर्लज्जपणे सरकार पाडतं, त्यांनी हीच निर्भयता…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
केईएम रुग्णालयामध्ये न्युराेलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आदिल छागला यांनी आशा यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल पाहिल्यानंतर तातडीने त्यांच्या मेंदूची अँजिओग्राफी करून शस्त्रक्रिय करण्याचा निर्णय घेतला. २१ फेब्रुवारीला आशा यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. तब्बल चार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर आशा यांच्या मेंदूतील रक्तवाहिनीवरील फुगा काढण्यात डॉक्टरांना यश आले. आशा यांच्या मेंदूतील रक्तवाहिनीवर दोन फुगे होते. हे फुगे फुटले असते तर आशा यांचा मृत्यू होण्याची शक्यता होती. शस्त्रक्रियेनंतर आशा यांची प्रकृती स्थिर आहे. ही शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयामध्ये अवघ्या ४० हजारांमध्ये करण्यात आल्याची माहिती डॉ. आदिल छागला यांनी दिली.
मेंदूमधील रस्तवाहिनीवर निर्माण होणारा फुगा साधारणपणे अनुवांशिक आजार, अधिक धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब, जडत्व यामुळे होण्याची शक्यता अधिक असते. सुमारे १०० पैकी चार व्यक्तींच्या मेंदूमधील रक्तवाहिनीवर फुगा निर्माण होण्याची शक्यता असते. मधुमेह, रक्तदाब आणि जडत्व असलेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास हा धोका संभवण्याची शक्यता असल्याचे डॉ. आदिल छागला यांनी सांगितले.