मुंबई : गर्भधारणा टाळण्यासाठी अनेकदा महिला कॉपर – टी (तांबी) बसवितात. तांबी सुरक्षित असली तरी, त्याकडे दुर्लक्ष केल्यास ती घातक ठरू शकते. याचा प्रत्यय सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल रुग्णाला आला. प्रसूतीनंतर गर्भाशयाच्या मुखावर बसवलेल्या तांबीकडे दुर्लक्ष केल्याने ती गर्भाशयातून पुढे सरकून थेट मूत्राशयाच्या पिशवीपर्यंत पोहचली होती. त्यामुळे मूत्राशयाच्या पिशवीमध्ये पू होऊन संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून महिलेची त्रासातून मुक्तता केली.
हेही वाचा >>> कर्ज वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या
दिवा येथे राहणारी महिला एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिची जानेवारी २०२४ मध्ये एका सरकारी रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तिने व तिच्या पतीने पुढील गर्भधारणा टाळण्यासाठी तांबी बसविण्याचा निर्णय घेतला. तांबी बसविल्यानंतर १० ते १२ दिवसांनी तिला न्यूमोनिया, पित्ताशयातील खड्यांचा त्रास होऊ लागला. यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर वडिलांना यकृताचा त्रास असल्याने डिसेंबरमध्ये ती त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात घेऊन आली. त्याचदरम्यान तिला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिने रुग्णालयातील स्त्री रोग विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. राजश्री कटके यांना दाखवले. यावेळी डॉक्टरांना तांबी अडकलेल्या ठिकाणी पू झाल्याचे आढळले. तांबी अधिक पुढे सरकल्यास मूत्राशयाची पिशवी फाटण्याची शक्यता होती. त्यामुळे २४ डिसेंबर रोजी डॉ. राजश्री कटके, शस्त्रक्रिया विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. विनया आंबोरे आणि त्यांच्या तुकडीने यशस्वी शस्त्रक्रिया केली.