मुंबईत अनेक विभागांत नागरिक डेंग्यू आणि तापाने आजारी पडले असताना पालिकेच्या ‘एन’ विभागातील आरोग्य अधिकारी-कर्मचारी दवाखाने, आरोग्य केंद्रे बंद ठेवून शुक्रवारी दुपारनंतर पार्टीत रंगले होते. निमित्त होते ते येणाऱ्या दिवाळीचे. पण रुग्णांकडे पाठ फिरवून पार्टीत मश्गूल झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविषयी नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत.
एन विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात पालिकेची १० आरोग्य केंद्रे आणि सहा दवाखाने आहेत. ही केंद्रे आणि दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात रुग्णांची तपासणी केली जाते. दवाखान्यांमधील बाह्य़रुग्ण विभागात दुपारी २ ते ४ या वेळेत अनेक रुग्ण येत असतात. वर्षांनगर, विक्रोळी पार्क साइट, रमाबाईनगर, पारशी वाडा, रामजीनगर, बर्वेनगर या झोपडपट्टय़ा या विभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत. या झोपडपट्टय़ांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. सप्टेंबरमध्ये या परिसरात डेंग्यूचे तब्बल १४८ रुग्ण आढळून आले होते. १ ते १८ ऑक्टोबर या काळात ४३ जण डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचे आढळून आले होते.
डासांचा प्रादुर्भाव आणि डेंग्यू-तापाचा फैलाव यामुळे नागरिक त्रस्त असताना एन विभाग कार्यालयातील आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिवाळीनिमित्त आरोग्य विभाग, दवाखाने आणि आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना १८ ऑक्टोबर रोजी घाटकोपरच्या एल. बी. एस. रोडवरील आर सीटी मॉलमध्ये जंगी पार्टी दिली. या पार्टीसाठी दवाखाने आणि आरोग्य केंद्रे दुपारी १ वाजताच बंद करून कर्मचारीवृंद आर सीटी मॉलमध्ये रवाना झाला. त्यात मलेरियासाठी नियुक्त केलेले कर्मचारीही सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर धिंगाणा घातल्यानंतर सुमारे २५० पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भोजनावर आडवा हात मारला.
मात्र घरोघरी जाऊन पाण्याच्या पिंपात अॅबेट औषध टाकणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांना मात्र या पार्टीपासून दूर ठेवण्यात आले होते. पार्टीमध्ये धांगडधिंगाणा घातल्यानंतर सायंकाळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी थेट घरची वाट धरली. मात्र उपचारासाठी दवाखाने आणि आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना हात हलवत घरी परतावे लागले. पालिका मुख्यालयात या पार्टीची गंधवार्ताही नाही. पार्टी देणारे आणि रुग्णांना वाऱ्यावर सोडून मौजमजा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.
आरोग्य विभागाच्या ‘पार्टी’विकारामुळे रुग्ण वाऱ्यावर
मुंबईत अनेक विभागांत नागरिक डेंग्यू आणि तापाने आजारी पडले असताना पालिकेच्या ‘एन’ विभागातील आरोग्य अधिकारी-कर्मचारी दवाखाने
First published on: 21-10-2013 at 03:43 IST
TOPICSरुग्ण
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors engages in party patients on gods blessing